Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीफलटण पालिका सभेत सत्ताधारी व विरोधकांत तू तु मैं झाल्याने प्रचंड गदारोळ

फलटण पालिका सभेत सत्ताधारी व विरोधकांत तू तु मैं झाल्याने प्रचंड गदारोळ

फलटण: फलटण नगरपालिकेच्या मागील काही सभांचे इतिवृत्त कायम करणेस अधिकार्‍यांचा हलगर्जिपणा, शहरातील सुरू असलेल्या व गत मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी थांबवलेल्या भुयारी गटार योजनेचा कामाला दिलेली स्थगिती व काही ठिकाणी झालेल्या कामामुळे मध्यभागी उखडलेल्या ठिकाणी रस्त्यांची झालेली दुरवस्था पावसामुळे झालेला चिखल व एका अधिकार्‍यांच्या बनावट सही शिक्का मारणेवरुन विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरीत जाब विचारला, तसेच शनिनगर येथील बागेसाठी केलेला 25 लाख रुपये खर्च केलेला त्या ठिकाणी बाग ही दिसत नाही यामुळे त्या ठिकाणी अजून निधी टाकण्यास स्वतः नगराध्यक्षांनी या विषयाला स्थगिती दिली.
या वेळी त्या प्रभागातील नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व प्रगतीताई कापसे यांनी चौकशी जरूर करा मात्र आम्हाला पुढील महत्त्वाची कामे करायची असल्याने निधी उपलब्ध करून द्या अशा एक ना अनेक विषयावर अनेक वेळा सत्ताधारी व विरोधक नगरसेवकांमध्ये तू तु मैं झाल्याने प्रचंड गदारोळ झाला होता.
फलटण नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आज नगरपालिकेच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभागृहात नगराध्यक्षा सौ.नीताताई नेवसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.या सभेस मुख्याधिकारी प्रसाद काटकर विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह सत्ताधारी व विरोधी नगरसेवक व नगरपालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते .
सभेच्या सुरुवातीलाच मागील काही सभांचे इतिवृत्त वाचून ते मंजूर करण्याबाबतचा विषय विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर ,सचिन बेडके अनुप शहा, सचिन अहिवळे यांनी मांडला.जोपर्यंत मागील इतिवृत्त कायम होत नाही तोपर्यंत सभा चालू देणार नसल्याचा इशारा विरोधकांनी दिला. मागील तीन-चार सभाचे इतिवृत्त कायम केले नसल्याचा मुद्दा वारंवार विरोधकांनी उपस्थित करून यावर मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांना धारेवर धरले.विरोधकांच्या आक्रमतेला तोंड देताना अधिकार्‍यांची यावेळी भांबेरी उडाली. यातच सत्ताधारी नगरसेवक पुढील विषय घ्या म्हणत होते तर विरोधक पुढील विषय घेण्यास मनाई करत होते. या गोंधळात नगराध्यक्षा नीताताई नेवसे यांनी मागील इतिवृत्त वाचन करण्यास सांगितल्यावर मागील तीन सभांचे इतिवृत्त कायम झाले नसल्याचे अधिकार्‍याकडून उघडकीस आलेने समशेरसिंह नाईक निंबाळकर व अनुप शहा यांनी मुख्याधिकारी काटकर यांना धारेवर धरीत कामात हलगर्जीपनाचा जाब विचारला. यावर नगराध्यक्षा नेवसे यांनी पुढील सभेत सर्व मागील इतिवृत्त वाचून कायम करण्यात येईल अशी ग्वाही दिल्यावर तसेच या प्रकाराबाबत दोषी असल्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर विरोधक शांत झाले. तर ज्या अधिकार्‍याला मिनिट्स लिहण्यासाठी सांगितले होते त्याने मिनिट्स न लिहल्याने संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करा अशी मागणी अनुप शहा यांनी केली या वेळी कलम 8 नुसार त्या अधिकार्‍याच्या पगारातील 1/3 रक्कम कापली जाईल असे मुख्याधिकारी काटकर यांनी सांगितले.
विषय पत्रिकेवरील विषय नंबर 9 च्या विषयावरही प्रचंड वादळी चर्चा झाली. प्रभाग क्रमांक सहा मधील नगरपालिकेच्या मालकीच्या जागेत शनिनगर येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी आमदार फंडातून 8 लाख रुपये मंजूर करण्याच्या ठरावावरुन विरोधकांनी यापूर्वी शनिनगर भागात विविध विकास कामे झाली असून त्यात आतापर्यंत झालेल्या खर्चाचा तपशील मागितला. तसेच याचा सर्वे नंबर मागून त्याचा मालकी हक्क कोणाचा असा प्रश्न उपस्थित केला. यावरुनही विरोधकानी अधिकारी वर्गाला सविस्तर माहितीबाबत धारेवर धरले. मुख्याधिकारी यांनी तपशील देण्यास सांगितल्यावर अधिकारी वर्गाकडून तपशील देताना यापूर्वी 25 लाख रुपये एका कामावर खर्च झाल्याचे सांगण्यात आले. ज्या कामावर 25 लाख खर्च झाले ते काम प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचे संबंधित अधिकारी यांनी स्पष्ट केल्यावर संतप्त विरोधकांनी सत्ताधारी व प्रशासनाला धारेवर धरले हा मोठा भ्रष्टाचार असून याची चौकशी होईपर्यंत हा विषय स्थगित करण्याची मागणी सचिन बेडके,अनुप शहा यांनी केली यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये भ्रष्टाचारावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले. आरोग्य सभापती अजय माळवे आणि अनुप शहा यांच्यामध्ये प्रचंड वादावादी झाली.या वेळी माळवे यांनी विरोधी पक्षनेते समशेरदादा तुम्ही पक्षपाती करीत आहात असा आरोप केला, सदरचे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आल्याने याप्रश्नी चौकशी करण्याची ग्वाही नगराध्यक्षा व मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली तसेच यावेळी नगराध्यक्षा यांनी सदरचा विषय स्थगित करण्याची घोषणा केली त्यावर हा विषय स्थगित करू नये म्हणून काही सत्ताधारी नगरसेवकांनी विरोध केला. मात्र या विरोधाला न जुमानता नगराध्यक्षा नेवसे यांनी सदरच्या विषयाला स्थगिती दिली याचे विरोधकांनी बाके वाजवून स्वागत केले.
शहरात सुरु असलेल्या भुयारी गटार योजनेमुळे शहरातील प्रमुख रस्ते उखडून त्यावर पॅचवर्क न झाल्याने सगळीकडे चिखलाचे वातावरण निर्माण झाले आहे याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत असून जनतेकडून नगरसेवकावर याबाबतीत नाराजी व्यक्त होत असल्याचे समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी निदर्शनास आणून सदर भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट आणि मनमानी पद्धतीने झाले असून या कामासाठी कोणत्याही प्रकारच्या तपासण्या तसेच मान्यता नाहीत.भूयारी गटाराच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य म्हणजे वाळू वापरणे गरजेचे असताना या साठी चुरा र्(ींीळ)वापरलेले आहे.सदरच्या कामावर नगरपालिका व्यवस्थित देखरेख करत नाही. मुख्याधिकार्‍यांचे कामाकडे लक्ष नसल्याचा आरोप विरोधकांनी करून त्यांना धारेवर धरले. तसेच नगरपालिकेतिल नगर अभियंताच्या नावाने बनावट सही व शिक्का मारून नगरपालिकेतीलच एका अधिकार्‍याने भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केला. या बनावट शिक्का व सहीने रक्कम लाटली आहे असा आरोप करीत यावरूनही प्रचंड गदारोळ माजून अखेर यावर चौकशी करण्याचे आणि संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिलेवर विरोधक शांत झाले. यावेळी अजय माळवे आणि समशेरसिंह यांच्यातही जोरदार तू तू मैं मैं झाली. नगराध्यक्षा यांनी दोघांना शांत केले मात्र आजची सर्वसाधारण सभा मोठ्या वादळी चर्चेने गाजली. तर आज मुरब्बीनेते व उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे बैठकीला हजर नसल्याने सत्ताधारी अडचणीत आले.
नगरपालिकेला एखादी लेखी माहिती कोणत्याही नगरसेवकांनी मागितली तर ती दिली जात नाही. नगरसेवकांना प्रशासनाकडून गृहीत धरले जात नाही हा सदस्यांचा अपमान असल्याचे सांगत समशेरसिंह यांनी या विषयावरुन अधिकार्‍यांना धारेवर धरले. विरोधकांच्या आरोपापुढे वस्तुस्थिती मान्य करीत यापुढे त्वरित माहिती म्हणजे पाच दिवसात माहिती देण्याचे आदेश काटकर यांनी दिले.
शहरातील मुतार्‍यांची दुरावस्थेबाबतही सचिन बेडके,सचिन अहिवळे या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केल्यावर आरोग्य सभापती अजय माळवे यांनी अनेक ठिकाणी मुतार्‍या (महिला व पुरुष ) मंजूर केल्या असून त्याची कामे लवकर सुरु करणार असल्याचे स्पष्ट केले यावेळी सत्ताधारी व विरोधी नगरसेवक उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular