फलटण: महाराष्ट्राचे पहिले बांधकाम मंत्री, फलटण संस्थानचे अधिपती महाराजा मालोजीराव नाईक निंबाळकर यांची जयंती श्रमजीवी दिन म्हणुन बाजार समितीच्या सभागृहात साजरा करण्यात आली. यावेळी बाजार समितीत कार्यरत असलेल्या हमाल व मापाडींचा विशेष सत्कार करण्यात आला.
बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात बाजार समितीत वर्षभर हमाली व मापाडीचे कष्टाचे काम करणार्यांचा सत्कार व भेट वस्तु देऊन हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी बाजार समितीचे व्हाईस चेअरमन भगवानराव होळकर, संचालक मोहनराव निंबाळकर, विनायकराव पाटील, प्रकाश भोंगळे, विजयकुमार शेडगे, परशुराम फरांदे, सचिव शंकरराव सोनवलकर, हमाल मापाडी प्रतिनिधी बापुराव करे, रामदास कदम आदींची प्रमुख उपस्थित होती.
बाजार समितीत हमाल व मापाडी वर्षभर कष्ट करत असतात. श्रीमंत मालोजीराजे व श्रमजीवींचे अतुट नाते होते. त्यांचे श्रमजीवींबद्दलचे योगदान विचारात घेता, श्रमजीवींनी वर्षभर केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मालोजीराजेंचा जन्मदिवस हा मश्रमजीवी दिनफ म्हणुन साजरा करावा अशी संकल्पना चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी गतवर्षीच्या सर्वसाधारण सभेत मांडली होती. त्यानुसार हा श्रमजीवी दिन साजरा करण्यात आला. यावेळी हमालांना टॉवेल, टोपी, शाल तर मापाडी यांना भुसार व भाजीपाला मार्केट मध्ये आवश्यक असणारे पॅड व कॅल्क्युलेटर देवून सन्मानित करण्यात आले व अल्पोपहारही देण्यात आला.
कार्यक्रमात प्रारंभी माण्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व श्रीमंत मालोजीराजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक सचिव शंकरराव सोनवलकर यांनी केले. आभार विनायक पाटील यांनी मानले.
कार्यक्रमास बाजार समिती स्टाफ अनुज्ञप्तीधारक हमाल, मापाडी, सिक्युरिटी गार्डस् बहुसंख्येने उपस्थित होते.
महाराजा मालोजीराव नाईक निंबाळकर यांची जयंती श्रमजीवी दिन म्हणून बाजार समितीच्या सभागृहात साजरी
RELATED ARTICLES

