फलटण: फलटण शहरासह तालुक्यात गेले 2 दिवस पावसाची संततधार सुरु असून आज रविवारी सकाळी संपलेल्या 24 तासात फलटण मध्ये सरासरी 48.44 मि.मी. पाऊस झाला असून फलटण तालुक्याची पावसाची सरासरी ओलांडली आहे.
या पावसामुळे ओढे, नाले तुडूंब भरुन वाहिल्याने ठिकठिकाणी वाहतुक खोळंबल्याचे चित्र होते. मतदान केंद्रावर कर्मचार्यांना घेऊन जाणार्या गाड्यांनाही पुराचा फटका बसल्याने त्यांनाही ताटकळावे लागले. उद्या होऊ घातलेल्या मतदानावरही या पावसाचे सावट पसरल्याने नेतेमंडळींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आज (रविवार) सकाळी संपलेल्या 24 तासात महसूल मंडल निहाय झालेला पाऊस मि. मी. मध्ये खालीलप्रमाणे – फलटण 34, बरड 74, आदरकी 56, आसू 35, तरडगाव 64, गिरवी 30, राजाळे 48, होळ 52, वाठार निंबाळकर 43 असा पडला असून ग्रामीण भागात रात्रभर पाऊसाची जोरदार बॅटींग सुरू असून सर्वत्र ठिकाणी पाणीच पाणी झाले असून आज रविवार फलटण व साखरवाडी येथील आठवडा बाजारावर खूप मोठा परिणाम झाला असून पालेभाज्याचे व शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले.
पावसाने शहरात अघोषित संचारबंदी या पावसाने लावली असल्याचे चित्र सर्वत्र होते तसेच पावसामुळे लोक घरातच अडकले आहेत. शाळेला व कार्यालयांनाही सुट्टी असल्याने लोकांनी घरातच थांबणे पसंत केले. सातारा फलटण मार्गावर मिरगाव येथे व फलटण पंढरपूर रस्त्यावर खडकहिरा ओढा येथील पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहिल्याने हे मार्ग काही काळ बंद राहिले.
बाणगंगा नदीलाही पूर आला असून सस्तेवाडी, कांबळेश्वर वाहतूक सकाळी काही काळ बंद होती. तसेच कुरवली बु., आंदरुड, मिरढे, निंबळक, वाठार स्टेशन येथील ओढ्यावरील पाणी पातळी वाढल्याने वाहतुक काहीकाळ पूर्णपणे बंद होती. जिंती (ता.फलटण) येथे ढगफुटी झाल्याप्रमाणे पाऊस कोसळला आहे. पावसाने सर्व रस्ते जलमय झाले आहेत, तर कोळकी (ता.फलटण) येथे विजेच्या तारांवर झाडाच्या फांद्या पडल्याने काही काळ वीज गायब झाली होती. मात्र पुढील धोका टाळण्यासाठी तेथील युवकांनी वीज पुरवठा खंडित करून त्या फांद्या काढल्या, तर सस्तेवाडी, खुंटे, आसू, विडणी या ठिकाणी प्रचंड पाऊस पडला असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान पावसाने तालुक्यातील ओढे, नाले तुडूंब भरुन वाहिल्याने त्याचा फटका आज होणार्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी मतदानासाठी मतपेट्या व कर्मचारी घेऊन जाणार्या बसेस काही काळ खोळंबल्या होत्या.
दरम्यान वीर धरणामधून नीरा नदी मध्ये 14438 क्यसेक्स विसर्ग सुरू होता. तथापी आज सायंकाळी पाचच्या सुमारास या विसर्गात घट करुन तो 5164 क्यूसेक्स पर्यंत स्थिर ठेवण्यात आला.
उद्या मतदान असल्याने या पावसाचे सावट उद्या होणार्या मतदानावरही पडण्याची शक्यता असल्याने नेते मंडळी, कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.