Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीपुरुषांनी महिलांच्या पाठीशी उभे राहावे:अ‍ॅड. मनिषा बर्गे

पुरुषांनी महिलांच्या पाठीशी उभे राहावे:अ‍ॅड. मनिषा बर्गे

रहिमतपूर: स्त्रियांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा आगळावेगळा ठसा उमटविला आहे. आत्मविश्वासपूर्वक वाटचाल करीत विविध क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. तरीही तिला समाजात मानाचे स्थान मिळताना दिसत नाही. सर्व क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता येण्यासाठी पुरुषांनी स्त्रियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे प्रतिपादन सातारा जिल्हा महिला, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अ‍ॅड मनिषा बर्गे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनेतंर्गत येथील सरदार बाबासाहेब माने महाविद्यालयातील लैंगिक छळ प्रतिबंध समितीच्या वतीने आयोजित केलेल्या मस्त्री पुरुष समानताफ या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रदीप दीक्षित हे होते.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रम समन्वयक डॉ.सुनंदा मोहिते, अग्रणी महाविद्यालय समन्वयक प्रा.श्रीकांत बोधे, प्रा.डॉ.संजय शिंदे यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
पुढे त्या म्हणाल्या की, पूर्वीच्या काळी समाजात अनिष्ट रूढी, परंपरा होत्या. यामुळे तिच्यावर मर्यादा आल्या. त्यामुळे त्या बंधनात अडकत गेल्या. पुढे म.फुले सावित्रीबाई फुले यांनी याविरुद्ध लढा उभारला. मुलींना शिक्षण मिळू लागले. आज शिक्षणामुळे मुली, महिला आपल्या पायावर उभ्या राहिल्या. पण गेल्या काही वर्षांत पुन्हा मुलगाच वंशाचा दिवा या मानसिकतेतून मुलींचा तिरस्कार होऊ लागला. त्यामुळे समाजात मुलींचे प्रमाण कमी होत गेले. असे सांगून त्या म्हणाल्या की, नोकरदार स्त्रियां पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. पण घरात आल्यावर तिनेच काम करावे अशी घरांतील सर्वांची अपेक्षा असते. यासाठी घरातील कामांची वाटणीही करता आली पाहिजे. मानसिक विकृतीतून समाजात जे आज मुलींवर, महिलांवर अत्याचार घडताहेत. हे कशाचे लक्षण आहे. ही विकृती नष्ट करण्यासाठी पुरुषांनी महिलांच्या पाठीशी उभे राहायला हवे.
प्रा. दीक्षित म्हणाले की, भारतीय संस्कृती पुरुषप्रधान आहे. त्यामुळे हाच प्रभाव समाजावर दिसतो आहे. परिणामी महिलांना दुय्यम स्थान दिले जात आहे. यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.श्रीकांत बोधे यांनी केले. प्रा. डॉ. सुनंदा मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. संजय शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी विद्यार्थिंनी, प्राध्यापक उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular