Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीजवान संभाजी भोसले यांचेवर अंत्यसंस्कार

जवान संभाजी भोसले यांचेवर अंत्यसंस्कार

रहिमतपूर : तारगाव (ता. कोरेगांव) येथील संभाजी केशवराव भोसले (वय 41) हे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. त्रिपुरा येथील पानीसागर याठिकाणी कर्तव्य बजावत असताना शनिवार, दि.2 नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या दरम्यान गोळी लागून मृत्यू झाला होता. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान त्यांचे पार्थिव तारगांव येथे दाखल झाले त्यांचे मोठे बंधू शहाजी व संभाजी यांच्या मुली तनुजा (वय 13)अपर्णा (वय 9 )यांनी हजारो लोकांच्या साक्षीने येथील कृष्णा नदीकाठी संभाजी यांच्या पार्थिवास अग्नी दिला .
तारगांव येथील संभाजी भोसले हे 1999 मध्ये सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. काही दिवसापूर्वी दीपावलीच्या सुट्टीत ते घरी आले होते. तसेच काही दिवसातच ते निवृत्त होणार होते त्या संबंधित लागणारी सर्व कागदपत्रे जमा करून दि. 30 ऑक्टोबर रोजी कामावर हजर झाले होते. दि. 2 रोजी रात्री बंदोबस्त करीत असताना गोळी लागून मृत्यू झाल्याची बातमी गावात कळली आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. कामावर हजर होण्यापूर्वी गावातील मित्र तसेच घरातील अनेकांशी बोलून मी लवकरच निवृत्त होऊन परत येत आहे.
परत आल्यावर कुठे दुसरी नोकरी मिळाली तर करायची नाहीतर शेती करू असे आश्वासन त्यांनी घरच्यांना दिले होते. परंतु, कामावर हजर झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी दिवशी गोळी लागून मृत्यू झाल्याची बातमी गावात आली तेव्हापासून गावातील सर्व व्यवहार बंद होते. त्यांच्या पार्थिवाची वाट सर्वजण पाहत होते. खराब हवामानामुळे पार्थीव येण्यास उशीर झाला.अखेर काल संध्याकाळी त्यांचे पार्थिव त्रिपुरा येथुन निघाले.
सकाळी सात वाजता पुणे विमानतळावर पोहोचले सीमा सुरक्षा दलाच्या गाडीने सकाळी साडेअकरा वाजता तारगाव मध्ये पोहोचले. संभाजी भोसले यांच्या अंतिम दर्शनासाठी परिसरातील गावातील अनेकांनी गर्दी केली होती .पार्थिव प्रथम घरी नेण्यात आले. पत्नी अलका व आई यांनी तिरंग्यात लपटलेले पार्थिव पाहताच मोठ्याने आक्रोश केला. यावेळी उपस्थित सर्व गहिवरले .
फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर मधून गावातून अंतिम यात्रा काढण्यात आली. पूर्ण रस्त्यावर दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. कृष्णा नदीकाठावर पटांगणात अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती. आमदार बाळासाहेब पाटील , जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, कोरेगाव पंचायत समिती सभापती राजाभाऊ जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, रहिमतपूर चे माजी नगराध्यक्ष संपतराव माने, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सिद्धेश्वर पुस्तके, पंचायत समिती सदस्य आण्णासो निकम, सरपंच सुलभा तावरे, उपसरपंच सुनिता निकम, रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, सैनिक कार्यालय प्रमुख सी. टी. पवार , शिवाजी पवार, सिमा सुरक्षा दलाचे डेप्युटी कमांडर श्रीधर निकम, शेरासिंग तुंडवाल यासह अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.
रहिमतपूर पोलीस स्टेशनच्या वतीने हवेत फायर करून सलामी दिली. सीमा सुरक्षा दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. पार्थिवाला लपेटलेला तिरंगा काढून वडील केशवराव भोसले व चुलते कांतीलाल पाटील यांच्या हवाली करण्यात आला.
संभाजी यांचे मोठे भाऊ शहाजी व संभाजी यांच्या लहान मुली तनुजा व अपर्णा यांनी पार्थिवाला भडाग्नी दिल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले. संभाजी यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, मुली तनुजा व अपर्णा तसेच दोन भाऊ असा परिवार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular