सातारा : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे नेतृत्व मानणार्या जिल्ह्याातील कार्यकर्त्यांनी सोमवारी कल्याण रिसॉर्टवर तब्बल दोन तास राजकीय खलबते केली. विकासाच्या मुद्यावर उदयनराजे यांनी भाजपबरोबर जाण्याचा राष्ट्रवादी विरोधी सूर या बैठकीत प्रकर्षाने उमटला. उदयनराजे यांना विरोध करणार्यांची वेळ आल्यावर त्यांना योग्य ती जागा दाखवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. अर्थात या सर्व घडामोडींवर उदयनराजे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशी भावना सर्वांनी यावेळी व्यक्त केली.
खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीकडून तिकिट देण्याच्या प्रस्तावाला थोरल्या पवारांनी जवळ जवळ कन्फर्मेशन दिलेले आहे. मात्र आमदारांच्या अंर्तगत विरोधामुळे उदयनराजेंच्या तिकिटांवर अद्याप शिककामोर्तब झालेले नाही . इकडे भाजपने मदन भोसले व नरेंद्र पाटील या दोन नावांचे राजकीय अस्त्र अत्यंत चलाखीने वापरत उदयनराजेंना जाळ्यात ओढण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही. या राजकीय पटावरचा सत्तासंघर्ष तेजीत येत असताना उदयनराजे समर्थक संभ्रमित आहेत. संभ्रमाचा हा गुंता सोडवून एक दिशा निश्चित करण्यासाठी सातारा जिल्हयातील समस्तराजे समर्थकांची बैठक येथील कल्याण रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीचे नियोजन संग्राम बर्गे, सुनील काटकर, गणेश जाधव, अॅड दत्ता बनकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. सर्व कार्यकर्त्यांना आपले मत मनमोकळेपणाने मांडण्याची संधी देण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रवादी विरोधी सूर उमटला त्याची कोंडी फोडली ती संग्राम बर्गे यांनी. त्यांनी विकासाच्या मुद्यावर भाजपबरोबर जाण्याची सूचना थेटपणे केली. तसेच उदयनराजे भोसले यांना पक्षात सतत बाजूला ठेवण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे राष्ट्रवादीकडून प्रत्यक्षात काय मिळाले? असा परखड प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विजयसिंह नायकवडी यांनी थेटपणे उदयनराजे जो निर्णय घेतील आणि जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल असे जाहीरपणे सांगत आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या. अॅड दत्ता बनकर म्हणाले, उदयनराजे भोसले यांनी निवडणुकीची अजिबात काळजी करु नय. वॉर रूम जय्यत आहे अगदी सगळी तयारी झाली आहे जे उदयनराजेंना विरोध करतात त्यांची ही वेळ लवकरच येणार आहे. कोणी मिसळ खावो की दही मिसळ कोणताही फरक पडणार नाही जे करायचे ते योग्य वेळी दाखवले जाईल च असा स्पष्ट इशारा बनकर यांनी देत सर्व समर्थक पुढील लढाईसाठी सज्ज असल्याचा इशारा दिला.
सुनील सावंत यांनी ही वैयक्तिक नातेसंबंधाच्या दबावाचा दाखला दिला मात्र उदयनराजे हेच आमचे नेतृत्व आहे त्यामुळे दुसरे कोणाचेच काम करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. बैठकीत राष्ट्रवादी विरोधी सूर सातत्याने उमटत राहिला. मात्र काही कार्यकर्त्यांनी उदयनराजे यांचे तिकिट राष्ट्रवादीकडून कन्फर्म आहे असा दाखला काही आमदारांच्या हवाल्याने दिला. शरद पवारांच्या आदेशानंतर सर्व आमदारांना उदयनराजे यांचे काम पक्ष म्हणून करावेच लागणार आहे यासंदर्भात उदयनराजे यांनी कोणताही वेगळा विचार करू नये असे सुचवण्यात आले. उदयनराजे यांना कोंडित पकडण्याचा जो प्रयत्न झाला त्याचे सोदाहरण दाखले बैठकीत देण्यात आले त्यामुळे उदयनराजे भोसले यांनी तातडीने निर्णय घ्यावा असे सुचवण्यात आले. या बैठकीस सुनील काटकर, जितेंद्र खानविलकर, जयवंत पवार, नितीन शिंदे, संदीप शिंदे, प्रताप शिंदे, बबलू साळुंखे, किशोर शिंदे, राजेंद्र यादव विजय यादव, माजी नगराध्यक्ष रंजना रावत, विकास शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
खा. उदयनराजे समर्थकांची कल्याण रिसॉर्टवर दोन तास राजकीय खलबते ; भाजपबरोबर जाण्याचा बैठकीत कार्यकर्त्यांचा सूर
RELATED ARTICLES