Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीमहावितरणच्या सुमारे सहा हजार कर्मचार्‍यांकडून रक्तदान

महावितरणच्या सुमारे सहा हजार कर्मचार्‍यांकडून रक्तदान

मुंबई: सामाजिक बांधिलकी जोपासत महावितरणच्या सुमारे 5 हजार 826 कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 11) एकाच दिवशी राज्यभरातील विविध कार्यालयांत आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदानाचे महादान केले. शासकीय रुग्णालयांतील गोरगरीब रुग्णांना या रक्तदानाचा फायदा होणार आहे.
यामध्ये राज्यात सर्वाधिक बारामती परिमंडलातील 805 कर्मचार्‍यांनी रक्तदान केले असून सोलापूर जिल्ह्यातील 438, सातारा जिल्ह्यातील 124 तर बारामती मंडल अंतर्गत बारामती, केडगाव व सासवड विभागातील 243 अशा एकूण 805 कर्मचार्‍यांनी रक्तदान केले. महावितरणच्या राज्यव्यापी उपक्रमामध्ये सर्वाधिक आघाडी घेतल्याबद्दल बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी कर्मचार्‍यांचे कौतुक केले आहे.
एखाद्या शासकीय कार्यालयाने संपूर्ण राज्यात एकाच वेळी रक्तदान शिबीराची एवढ्या मोठ्या संख्येत यशस्वी आयोजन करणे व त्यात एवढ्या मोठया प्रमाणात कर्मचार्‍यांनी सक्रीयपणे सहभागी होणे अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून या उपक्रमाचे सार्वत्रिक कौतूक होत आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी महावितरणच्या राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये एकाच दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले. त्या आव्हानास मोठा प्रतिसाद देत महावितरणकडून राज्यातील विविध कार्यालयात ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे 5 हजार 826 कर्मचार्‍यांनी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी आज रक्तदान करून महादानाचे कर्तव्य बजावले. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
महावितरणच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करून या राज्यव्यापी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू, संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, संचालक (मानव संसाधन) ब्रिगेडीयर (सेवानिवृत्त) पवन कुमार गंजू, कार्यकारी संचालक सर्वश्री चंद्रशेखर येरमे, प्रसाद रेशमे, अरविंद भादीकर, दत्ता शिंदे उपस्थित होते. या सर्वांनी शिबिरात सहभाग नोंदवून रक्तदान करुन कर्मचार्‍यांना प्रोत्साहित केले.
यावेळी केईम रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय पथकांनी आयोजनासाठी सहकार्य केले. तसेच राज्यभरातील रक्तदान शिबिरासाठी शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालये व रक्तपेढ्यांनी सहकार्य केले तर महावितरणचे कर्मचारी व त्यांच्या परिवारातील सदस्य रक्तदानासाठी सकाळपासूनच उस्फुर्तपणे सहभागी होत होते. रक्तदान करणार्‍या कर्मचार्‍यांना प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले.
रक्तदानामध्ये परिमंडलनिहाय सहभागी झालेले महावितरणचे कर्मचारी व त्यांच्या परिवारातील एकूण सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे – मुख्य कार्यालय प्रकाशगड-164, बारामती परिमंडल-802, पुणे परिमंडल -117, कोल्हापूर परिमंडल -692, रत्नागिरी परिमंडल-37, नाशिक परिमंडल- 500, औरंगाबाद परिमंडल -232, नांदेड परिमंडल-308, अकोला परिमंडल-430, नागपूर परिमंडल- 636, अमरावती परिमंडल-367, चंद्रपूर परिमंडल-356, गोदिया परिमंडल-110, लातूर परिमंडल-385, कल्याण परिमंडल-299, भांडूप परिमंडल- 246, जळगांव परिमंडल- 145
राज्यव्यापी रक्तदानाच्या महादानात सहभागी झालेल्या सर्व कर्मचार्‍यांचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, संचालक दिनेशचंद्र साबू, सतीश चव्हाण, जयकुमार श्रीनिवासन, भालचंद्र खंडाईत, ब्रिगेडीयर पवनकुमार गंजू, कार्यकारी संचालक (मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे, प्रभारी प्रादेशिक संचालक सुनील पावडे यांनी कौतुक केले असून या रक्तदान शिबीराला सहकार्य करणार्‍या शासकीय व निमशासकीय रक्तपेढ्यांच्या वैद्यकीय पथकांचे आभार मानले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular