Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीजिल्ह्यात...61.. टक्के मतदान

जिल्ह्यात…61.. टक्के मतदान

सातारा येथे श्री. छ. उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क
सातारा : सातारा जिल्ह्यात लोकसभेची पोटनिवडणूक आणि आठ विधानसभा मतदारसंघासाठी आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 60.99 टक्के मतदान झाले.ईव्हीएम मशीनमध्ये किरकोळ झालेले तांत्रिक बिघाड वगळता सातारा जिल्हयात शांततेने मतदान पार पडले .पंधरा लाख अडोतीस हजार मतदारांनी 73 उमेदवारांचा राजकीय निर्णय मशीन बंद केला . जावली व पाटण तालुक्यातील दुर्गम भागातील मतदान केंद्र व खंडाळा तालुक्यात काही मतदान केंद्रांवर सहा वाजल्यानंतरही मतदान प्रक्रिया सुरूच होती. त्यामुळे मतदानाची निश्चित टक्केवारी समजू शकली नाही .मतदानाचा टक्का गतवर्षीच्या तुलनेत वाढल्याने राजकीय धाकधुक मात्र वाढली आहे . सातारा जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 25.61 टक्के मतदान झाले होते. पावसाने उघडीप दिल्यामुळे बहुतांश नागरिकांनी सकाळीच मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. सातारा येथे राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, श्री. छ. उदयनराजे भोसले, श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले, श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले आणि दीपक पवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान लोकशाहीच्या उत्सवादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपापल्या मतदारसंघांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी, संपर्क दौरा, पदयात्रा कोपरा सभा घेऊन आपापल्या भूमिका जाहीर केल्या होत्या. या निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खा. अमोल कोल्हे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, अमोल मेटकरी यांच्या जाहीर सभा झाल्यामुळे प्रचारात मोठी रंगत येण्याबरोबरच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर वाई- महाबळेश्वर- खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मदन भोसले आणि माण – खटाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेखर गोरे यांच्या वाहनांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या दोन घटना वगळता जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
निवडणूक आयोगाने मतदानासाठी सोमवार दि.21 ऑक्टोंबर हा दिवस निश्चित केला होता. मतदानाला दोन दिवस बाकी असतानाच सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने कहर केल्यामुळे त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असतानाच सोमवारी पहाटेपासून पावसाने आश्चर्यकारक उघडीप दिल्यामुळे मतदान करण्यासाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. मतदान साठी सातारा जिल्ह्यात 2978 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. त्यासाठी 22 हजार कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. आज सकाळी सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले यांनी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे औक्षण केले. तदनंतर उदयनराजे भोसले यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत आनंद इंग्लिश स्कूल येथे मतदानाचा हक्क बजावला. आपआपल्या उमेदवारांना अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली होती. मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे, त्यांना मतदान स्लिप देणे, वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे या कामात कार्यकर्ते दिवसभर व्यस्त होते. प्रशासनाच्यावतीने दिव्यांग, गरोदर महिला यांना मतदान करण्यासाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. मतदान प्रक्रिया दरम्यान सातारा येथे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
पावसाने उघडीप दिल्यामुळे सकाळी मतदान केंद्रांवर मतदानासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. जिल्ह्यामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 25.61 तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत ….60.99…. टक्के मतदान झाले. माण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक. वाई कोरेगाव कराड उत्तर कराड दक्षिण व पाटण सातारा सहा मतदारसंघातून 11,44,553 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला .61.85 टक्के नागरिकांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले . फलटण व माण मतदारसंघातून 3,93,750 मतदारांनी मतदान (58.60%) केले . एकूण 1538303 मतदारांनी लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवात (6े.99%) भाग घेतला . सर्वाधिक मतदान वाई तालुक्यात (204072,) त्या खालोखाल मतदान माण तालुक्यात (198970) झाले असून सातार्‍यात सर्वात कमी 1,85382 एवढे मतदान झाले आहे . खंडाळ्यात अंदोरी, अहेरी या भागात मतदान केंद्रावर गर्दी वाढल्याने सायंकाळी सहाच्या नंतर ही मतदान सुरू होते . कांदा टी तसेच पाटण तालुक्याच्या दुर्गम भागातील मतदानाची आकडेवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली नाही . माण तालुक्यात चार केंद्रावर ईव्हीएम मशीनची प्रोसेसिंग स्लो झाल्याच्या तक्रारी होत्या . सातारा तालुक्यात सायगाव व आनेवाडी मतदान केंद्रावर काही काळ मशीन बंद पडल्याचे प्रकार घडले . दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्हयात अठ्ठावीस टक्के चार वाजेपर्यंत एकोण पन्नास तर पाच वाजेपर्यत एकसष्ट टक्के मतदान झाले. दुपारी चार ते सहा या दोन तासात मतदानाची टक्केवारी शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातून वाढली.
लोकांनी निर्णय घेतला आहे : श्री. छ. उदयनराजे भोसले
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले, मी आणि सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप युतीचे सर्व उमेदवार विजयी झालेले आहेत. हे मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये सांगतोय असे नव्हे तर गोपनीय अहवाल ही तसेच आहेत. वाई विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मदन भोसले यांच्या गाडीवरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत याची लोकांनी नोंद घेतली आहे. लोकं विचार करूनच निर्णय घेतील. दहशत निर्माण करून तुम्ही लोकांना मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही, लोकांनीच आता निर्णय घेतला आहे, असेही उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगितले. दरम्यान लोकसभेचा मतदारसंघ विकासाच्या दिशेने नेणार्‍या योग्य उमेदवाराला नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मतदार मला पुन्हा निवडून देतील : शिवेंद्रसिंहराजे भोसले
सुरूची या निवासस्थानी सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना – भाजप- आरपीआयचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी उपोषण केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे आपल्या कुटुंबासमवेत मतदान केंद्रावर गेले. तेथे रांगेत उभे राहून त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी प्रसिद्धि माध्यमांशी बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामामुळे मतदार संघांमध्ये उत्साह आहे. मीही माझ्या विधानसभा मतदार संघामध्ये कामे केली आहेत, त्याचा या निवडणुकीत निश्चित फायदा होईल. सातारा शहर व विधानसभा मतदार संघातील लोक मला पुन्हा निवडून देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मदन भोसले आणि शेखर गोरे यांच्या वाहनावरील हल्ल्यासंदर्भात बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, निवडणुका लोकशाही मार्गाने झाल्या पाहिजेत. दहशत माजवून, मारामार्‍या करून कोणीही निवडून येऊ शकत नाही. शरद पवार यांच्या सभेचा मतदानावर काय परिणाम होईल का? या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, शरद पवार यांच्या सभेनंतर मतदार संघात कोणतेही वेगळे चित्र पाहायला मिळाले नाही. कुठे चर्चा होतानाही आढळली नाही.
चौकट- मतदार संघनिहाय मतदान पुढील प्रमाणे 1) वाई -204072, 2) कोरेगाव – 189329, 3) कराड उत्तर-185804, 4) कराड दक्षिण -188465, 5) पाटण – 191501 6) सातारा – 185382, एकूण मतदान – 1144553 टक्केवारी -61.85%, 1) फलटण – 194780, 2) माण-198970 एकूण मतदान -393750, 58.60%, जिल्हयाचे सरासरी मतदान – 60.99%.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular