सातारा: आधीच राजकीय संघर्ष टोकाचा आणि विकास कामातही शह- काटशहाचे राजकारण यामुळे शाहूनगर व गोडोली या भागातील रस्त्यांना खड्डयांचे ग्रहण लागले आहे. आधीच खड्डे आणि त्यात तुंबलेल्या गटाराचे पाणी यामुळे शाहूनगरच्या त्रिशंकू भागाची व्यथा संपलेली नाही.नगरपालिकेने पाच वर्षापूर्वी 32 कोटी रूपये खर्च करून शहरातील 65 रस्ते तयार केले होते. त्यानंतर गोडोली शाहूनगर पायाभूत सुविधांसाठी मुख्यत्वे रस्त्यांसाठी झगडत आहे.
मोनार्क चौक ते बागडे वस्ती हा रस्ता डीपीप्रमाणे चाळीस फुटाचा आहे मात्र काळोखे चौकाच्या पुढे अस्त्याव्यस्त अतिक्रमणांनी निम्मा रस्ता गिळला आहे . गणेश कॉलनी – जिजाऊ उदयान- समाज मंदिर ते मोरे मळा या मुख्य रस्त्यांवर प्रचंड खड्डे व रस्त्यावरुन वाहणारे गटाराचे पाणी अशा दुहेरी अडचणीतून नागरिकांना वाट काढावी लागत आहे . मात्र, परतीच्या पावसाने या रस्त्यांचा दर्जा समोर येऊ लागला आहे. शहरात सर्व ठिकाणी खड्डेच खड्डे दिसत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त असतानाही पालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. शहरातील असा एकही रस्ता राहिला नाही की ज्या रस्त्यावर खड्डा नाही. वाहनधारक आणि नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्ड्यात पाणी साचल्याने किरकोळ अपघात आणि भांडणाचे प्रकार घडत आहेत. सर्वच ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनाचे सर्व पार्ट सुटे होत असून नागरिकांना मणक्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे . नगरसेवक शेखर मोरे यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वारंवार पाठपुरावा केला तेव्हा 2017 मध्ये एकदाच गोडोलीत काही भागाच्या पॅचिंगसाठी सहा लाख रुपये देण्यात आले होते .बरीचशी विकास कामे ही राजकीय आकसातून हाणून पाडण्यात आली . मात्र आमदार खासदार एकाच पक्षात गेल्याने नगरसेवक एक झाले तरी राजकीय सवता सुभा कायम आहे . गोडोली प्रवेशद्वार ते अजिंक्यतारा पायथा हा रस्ता मंजूर झाला . मात्र ठेकेदाराच्या वेळकाढूपणामुळे सर्वच कामाची बोंब झाली .
सुधारित पाणी पुरवठा योजना अमलात आणण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शहरात मोठ मोठे खड्डे खणले होते. ही योजना आता पूर्णत्वास आली आहे. मात्र, या खड्ड्यांमध्ये फक्त मुरूम टाकल्याने पावसात सर्वत्र चिखल होत आहे. सायन्स कॉलेज रस्ता, काळोखे चौक, मीनाक्षी बंगला शिवनेरी कॉलनी जगताप वाडी खालचा रस्ता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे सायन्स कॉलेज ते शिवाजी महाविद्यालयाच्या वळणावर मोठा खड्डा पडला असून विद्यार्थ्यांना येता जाता अडचण येत आहे. तसेच पाणी साचल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रहिमतपूर रोडवरील मोनार्क चौक येथेही खड्डा पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. ठेकेदारांना पॅचिंगसाठी तीस लाख रुपये देण्यात आल्याची पालिकेच्या वित्त विभागाची माहिती आहे . त्यात गोडोलीच्या वाट्याला किती? याचे उत्तर खुद्द आजी माजी नगरसेवकांना माहित नसणार अशी परिस्थिती आहे.
त्रिशंकू भागामुळे पायाभूत सुविधांचा विचका
RELATED ARTICLES

