सातारा: मानवी शरिराची रचना ही सर्वसमान नसते. काही वेळेला एखाद्या अवयवामध्ये व्यंग आढळते तर कधी दृष्टीहीन होते. पण त्यांची तल्लख बुध्दी अनेकांना आश्चर्यचकित करते. सध्या चलनामध्ये झालेल्या बदलामुळे तसेच नव्या नोटांमुळे अंध लघुविक्रेत्यांना कसरत करावी लागत असल्याचे दिसून आलेले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्टेट बँक ऑफ इंडियाने विविध योजना व कर्ज प्रकरणाची माहिती देण्यासाठी सातारा सैनिक स्कुल या ठिकाणी स्टॉल उभारले आहेत. यामध्ये अंध विक्रेते तसेच खाद्य पदार्थ विक्रेते यांचाही समावेश केलेला आहे. किडगाव (ता.सातारा) येथील अंध स्नेहल इंगवले व शरद इंगवले यांनी कंगवा व अगरबत्ती स्टॅन्ड विक्रीसाठी ठेवलेले आहेत. त्यांच्याकडे ग्राहक आकर्षित होतात. पण घेतलेल्या वस्तूंचे पैसे देताना दहा, पन्नास, शंभर रूपयांच्या नवीन नोटा तपासून घेताना त्यांना कसरत करावी लागते. त्याचबरोबर पाच व दहा रूपयांची नाणी स्विकारली जातात.
हे दोघेही विक्रेते अंध असल्याने त्यांना कोणीही फसवत नाहीत परंतु त्यांच्याकडे असलेल्या बुध्दीकौशल्यानुसार ते नोटा व नाणी बरोबर ओळखतात.किडगाव येथून हे दोघे अनेक ठिकाणी कंगवे व लहान वस्तुंची विक्री करतात. ग्राहक वर्गानेही त्यांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा अनेकजण व्यक्त करित आहेत. सध्या पे-टीएम, एटीएम व ऑनलाईन पेमेंटच्या जमान्यात फसवणूक होत असली तरी या अंध विक्रेत्यांची अद्याप कोणीही फसवणुक केली नाही.आजही माणुसकी जिवंत आहे याचे सवर्त्र समाधान वाटत आहे.
नव्या नोटांमुळे अंध लघुविक्रेत्यांना करावी लागते कसरत
RELATED ARTICLES