सातारा: सातारा-लोणंद रोडवरील वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथील माऊली रेस्टॉरंट समोर रस्त्यावर गस्त करीत असताना लोणंदच्या दिशेकडून येणारी मोटारसायकल संशयास्पद वाटल्याने थांबवून वन विभागाच्या पथकाने तपासणी केली असता मोटारसायकल चालक श्रीरंग श्रीपती चव्हाण रा. पिंपोडे खुर्द ता. कोरेगाव यांच्याकडे असणार्या पोतड्यामध्ये 12 जिवंत व 1 मृत अशी बंदीस्त करुन ठेवलेल्या घोरपड हा वन्य प्राणी मिळून आल्या. आरोपीविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 चे कलम 9,39, 42 व 43 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून याचा पुढील तपास सुरु करण्यात आलेला आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन) सचिन डोंबाळे यांनी दिली आहे.
घोरपड हा वन्यप्राणी निसर्गाच्या अन्नसाखळीत महत्वाचा घटक असल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियममध्ये याला अनुसूची 1 मध्ये स्थान देऊन व्यापक संरक्षण दिलेले आहे. घोरपडीच्या मासाबाबत समाजामध्ये अनेक गैरसमजुती आहेत. सामान्य लोकांकडून घोरपडीचे मांस विकत घेतले जाते, परंतु वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये शिकार करणार्याबरोबरच मांस घेणारा देखील गुन्हार असून याच कायद्याच्या कलम 51 अन्वये 3 वर्षे ते 7 वर्षांपर्यंत कैद व 10 हजार रुपये दंडापर्यंतची शिक्षेची तरतुद आहे. मांसाच्या लोभापायी अशा गंभीर गुन्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे सहभागी होऊ नये व अशा प्रकारच्या कोणत्याही वन्यप्राण्याच्या शिकारीबाबत कोणतीही माहिती असल्यास वनविभागाच्या स्थानिक कार्यालयाशी किंवा 1926 या वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. डोंबाळे यांनी केले आहे.
या कारवाईमध्ये वनपाल गजानन भोसले, वनरक्षक दिपक गायकवाड, विजय भोसले, राजेश वीरकर, सुहास पवार, दिनेश नेहरकर यांनी सहभाग नोंदविला होता.
घोरपड तस्करावर वनविभागाकडून कारवाई 1 मृत व 12 जीवंत घोरपडी घेतल्या ताब्यात
RELATED ARTICLES