Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीदोन्ही राजांची एकत्र बसून चर्चा

दोन्ही राजांची एकत्र बसून चर्चा

सातारा : गेल्या अडीच वर्षातील आंतरविरोधाच्या टोकदार जखमा बाजूला ठेऊन खासदार उदयनराजे भोसले व आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातार्‍यात एकत्र बसून चर्चा केली. झाले गेले गंगेला मिळाले असे म्हणत दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे लोकसभेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. या राजकीय मनोमिलनाची सातार्‍यात दिवसभर चर्चा होती.
येथील महाराजा हॉटेलच्या रूम नं 77 मध्ये सोमवारी रात्री साडेनऊ वाजता दोन्ही चुलत भावांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचे मायक्रो प्लॅनिंगवर चर्चा केली. उदयनराजे यांचे समर्थक सुनील काटकर व नरेंद्र पाटील यांनी पुढाकार घेऊन ही बैठक घडवून आणली. मागील सगळ्या वादांवर पडदा टाकून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीत मदत करावी ही अपेक्षा व्यक्त केली. ही बैठक अत्यंत गोपनीय झाली मात्र सकारात्मक चर्चा आणि शरद पवार यांचा आदेश या बाबींमळे सातार्‍यात भाऊबंदकीचा गृहकलह माजणार नाही हे निश्चित झाले असून राजकीय अनिश्चिततेचे सावट दूर झाले आहे
चौकट- नगरपालिका निवडणुकांमधील वेदांतिका राजे भोसले यांचा पराभव त्यानंतरचा सुरूची राडा या सगळ्याच सलणार्‍या राजकीय अनुभवांमध्ये राष्ट्रवादी म्हणून आमदार शिवेंद्र राजे भोसले सातारा विधानसभा मतदारसंघात प्रचंड आक्रमक झाले होते. त्यामुळे दोन भावांमधील टोकदार राजकीय संघर्ष राष्ट्रवादीसाठी डोकेदुखीचा विषय झाला होता. मात्र पवारांच्या यशस्वी शिष्टाईनंतर मनोमिलनाचा पुढील अंक महाराजा हॉटेलच्या रूम नं 77 येथे पार पाडला. दोन्ही नेत्यांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेऊन पक्षासाठी एकत्र येण्याचा समंजसपणा दाखवला. येत्या 24 मार्च रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ कराडात फुटणार आहे. त्याआधीच दोन्ही नेत्यांनी केलेल्या राजकीय मनोमिलनाचे राजकीय वर्तुळात स्वागत होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular