टोलनाक्यावरील कर्मचार्याला टोळीची दगडाने ठेचून मारहाण
सातारा : महामार्गावर आनेवाडी टोल नाक्यावर मध्यरात्री टोल मागितल्याच्या कारणावरून पुणे येथील एका टोळीने गोळीबार केला. टोलनाक्यावरील एका कर्मचार्याला संबंधितांनी दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला असून पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती आटोक्यात आली. या हल्ल्यात विशाल दिनकर राजे (रा. लिंब) जखमी झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की आनेवाडी टोल नाक्यावर रात्री रोजी एक वाजता सातारा पुणे हायवेवरील टोल बूथ क्रमांक एक समोर स्विफ्ट कार नंबर एमएच 12 एन. जे. 302 ही कार टोल न भरता पळून जात होती. यावेळी या कारला टोल बूथवर काम करणार्या कर्मचार्यांनी अडवून धरली. यादरम्यान या कारच्या पाठीमागून आलेल्या रिएट्स फॉर्च्यूनर या गाडीतील पाच ते सहा इसमांनी त्यांच्यासमवेत असणार्या रोहिदास उर्फ बापू चोरगे (रा. पुणे) यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने टोल नाका कर्मचार्यांच्यावर गोळीबार केला.
संबंधित कर्मचारी जीव वाचवण्याच्या आकांताने पळून जाऊन आडोशाला लपले. यातीलच एक कर्मचारी विशाल दिनकर राजे (रा. लिंब) हे पळताना पडल्याने संबंधितांनी त्यास दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान व्यवस्थापक विकास शिंदे यांनी चोरगे यांच्या हातातील पिस्तूल काढून घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळी भुईंज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा, पीएसआय दुर्गा नाथ साळी व कर्मचार्यांनी धाव घेतल्यानंतर जखमींना सातारा येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. या प्रकरणी तपासासाठी पथक रवाना करण्यात आले.
मध्यरात्री घडलेल्या प्रकारामुळे जिल्हा प्रशासन हादरले. जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख धीरज पाटील, वाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित ठीके, स्थानिक गुन्हा शाखेचे सर्व अधिकारी पहाटेपर्यंत टोल नाक्यावर होते. याबाबत भुईंज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
आनेवाडी टोल नाक्यावर मध्यरात्री टोल मागितल्यावरून गोळीबार
RELATED ARTICLES