Monday, October 27, 2025
Homeठळक घडामोडीघटना मोडतो म्हणणारांचा पराभव करा: डॉ. भारत पाटणकर

घटना मोडतो म्हणणारांचा पराभव करा: डॉ. भारत पाटणकर

सातारा : शिवछत्रपतींचे समानतेचे धोरण त्यांच्या वारसदारांपेक्षा आणखी दुसरे कोण गतीने राबवू शकणार?, धरणग्रस्तांच्या व्यथा – वेदना आत्मीयतेने समजून घेणार्‍या उदयनमहाराजांनाच संसदेत पाठवण्याचा निर्धार श्रमिक मुक्ती दलाने केला आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा दीड ते पावणेदोन लाख मते वाढून प्रकल्पग्रस्तांचा लढा अधिक गतीने चालू ठेवण्यासाठी आणि घटना मोडतो म्हणणारांचा पराभव करण्यासाठी उदयनराजेंना निवडुन देऊया, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांनी केले आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी कल्याण रिसॉर्ट येथे आयोजित प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त यांच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते.व्यासपिठावर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, श्रमिक मुक्ती दलाचे डॉ प्रशांत पन्हाळकर, संदीपभाऊ शिंदे, हरितात्या दळवी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ पाटणकर म्हणाले कि, त्यागाची शिकवण देणारे प्रकल्पग्रस्त शेतकरी मातीतून नवनिर्माण करावे तसेच धान्य पिकवतात आणि अन्याय करणार्‍यांना त्याच मातीत गाडतातसुद्धा. हे आजवर प्रकल्पग्रस्तांनी सिद्ध केले आहे. अन्यायाविरुद्ध लढा देणारी ही माणसे शब्दाला भाले फुटतील, अशा ताकदीची आहेत. देशाचं भवितव्य घडावं म्हणून स्वतःच्या घरादाराचा त्याग करण्याची परंपरा त्यांनी जपली आहे. असे असतांना घटनेने दिलेला समानतेचा हक्क डावलून पुन्हा जातीच्या उतरंडीची वर्ण व्यवस्था आणू पाहणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी आणि राज्यघटना मोडतो म्हणणार्‍यांचा पराभव करण्यासाठी लढणार्‍या आपल्या माणसांसोबत एकत्र येऊया. कारण आपली माणसेचं आपल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सक्रिय राहतात. सैन्याने मर्दुमकी गाजवली तरी त्याचे श्रेय घेणार्‍या मंडळींना धडा शिकवण्यासाठी या निवडणुकीत परिवर्तन घडवा. पुनर्वसनाच्या बरोबरीने समन्यायी पाणी वाटप व शेतीसाठीच्या पाण्याची भूक भागवण्यासाठी नवे धोरण आखले जावे, त्यासाठीच उदयनराजेना संसदेत पुन्हा पाठवायला हवे.
आमदार शशिकात शिंदे म्हणाले की, देशात विविध प्रश्नांवर आजवर झालेल्या सर्व मोर्चे, आंदोलने व उपोषणे मोडीत काढली गेली. मात्र प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त यांचे राज्यातील एकमेव आंदोलन असे आहे कि, जे कोणी मोडू शकले नाही, धरणग्रस्थांनी देशाला क्रांतीची दिशा दाखवली. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम केला, मात्र अजूनही हे बांधव अपेक्षित आहेत. त्यांना मिळालेलं डॉ. पाटणकर यांचे समर्थ नेतृत्व खर्‍या अर्थाने या चळवळीच्या यशामध्ये दीपस्तंभ आहे. डॉ. पाटणकरांच्या ताकदीला उदयनराजेंची जोड मिळाल्यास प्रकल्पग्रस्तांचे काहीच प्रश्न शिल्लक राहणार नाहीत. कारण नावांमध्ये वजन आणि ताकद असावी लागते, ती या दोन्ही नेतृत्वांकडे आहे. हुकूमशाहीविरोधात लढण्यासाठी सर्वांनी मताधिक्याने महाराजांना पुन्हा संसदेत पाठवावे.
खा श्री छ उदयनराजे भोसले म्हणाले की, कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाल्यापासून मी हि चळवळ पाहतो आहे. परंतु मनामध्ये कोणताही किंतु ,परंतु, चिंतू अशा शंका न ठेवता एकच ध्यास प्रकल्पग्रस्थांचा विकास या सूत्राने काम करणारे भारत पाटणकर हे आदर्श समाजसेवक आहेत. आपले प्रश्न सुटावेत म्हणून उन्हं, पाऊस, वारा, थंडी यांची तमा बाळगता महिनोंमहिने आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर आंदोलन करणारे प्रकल्पग्रस्थ पहिले की, कुठे गेली लोकशाही ? कुठे गेली प्रशासनाची माणुसकी? असे प्रश्न उभे राहतात. खरे तर तुम्ही फार साधे लोक आहेत. निस्वार्थी, स्वच्छ आणि धुतल्या तांदळासारखे प्रकल्पग्रस्थ त्यांचे प्रश्न सुटावे म्हणून माझ्या पाठीशी उभे राहत आहेत याचे मला समाधान वाटते. पुनर्वसनाचे प्रश्न रखडले म्हणून डोळे पुसण्याची वेळ आता नाही, तर पदर खोचून लढा देण्याची वेळ आली आहे. तुमच्या हातालाच एवढी धार आहे की, तलवारीची गरजच भासणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रश्नांची जोरदार लढाई लढण्यासाठी सिद्ध व्हा. गेल्या निवडणुकीत ज्यांना बहुमत दिलेत, त्यांनी राष्ट्राची नैसर्गिक संपत्ती उद्योगपतींच्या हाती सोपवली. त्यातून मूठभर उद्योजकांना गलेलठ्ठ संपत्ती प्राप्त झाली. देशाच्या वार्षिक बजेटपेक्षाही त्यांनी मोठ्या उलाढाली केल्या. कोयनासारखे पन्नास ते साठ धरणे बांधली जातील, एव्हढी कमाई या उद्योगपतींनी केली. आता सरकारला सत्तेवरून हटवा आणि उद्योगपतींनी लुटलेल्या पैश्याच्या व्याजातून मोफत शिक्षण, खुली आरोग्य सेवा, उत्तम रस्ते आम्ही जनतेला देऊ. ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाही त्याला घर आणि भुकेलेल्यांना पोटभर अन्न देण्यासाठी देशात परिवर्तन घडवाच.
या मेळाव्यात संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या प्रकल्पग्रस्तांनी जोरदार घोषणा देत आणि हात उंचावून उदयनराजेंना विक्रमी मतांनी विजयी करू असा निर्धार व्यक्त केला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular