वडूज: माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील अनेक मातब्बर गोरे बंधूंना हटविण्यासाठी एकत्र आले आहेत. सर्वांचे ध्येय, उद्देश एक आहे. मात्र उमेदवार निवडीची प्रक्रिया अद्याप स्पष्ट झाली नाही. गेले चार दिवस मॅरेथॉन बैठका बसत आहेत. मात्र उमेदवारीबाबत एकमताने निर्णय होत नाही. त्यामुळे या आघाडीच्या समर्थकांना औत्सुक्य लागले आहे. रविवारी घटस्थापने पर्यंत तरी आपलं ठरलयं च्या उमेदवारीचा घट बसणार का? याबाबत उलट सुलट चर्चा आहे.
आपलं ठरलयं म आघाडीतून सुरुवातीला भाजपाचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर, अनिलभाऊ देसाई, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी सभापती संदिप मांडवे, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख या पाच जणांची नांवे चर्चेत होती. एकंदरीत परस्थिती पाहता गेल्या आठवड्यात समजदारीची भूमिका घेवून डॉ. येळगांवकर व घार्गे साहेबांनी स्वत: थांबने पसंत केले होते. सुरुवातीच्या काही बैठकीस निवृत्त आयुक्त श्री. देशमुख यांनीही निवडणूक लढविण्यास असमर्थता व्यक्त केली होती. त्यामुळे या आघाडीच्या उमेदवारीसाठी रणजित देशमुख, अनिल देसाई व संदिप उर्फ पिंटू पैलवान या तीन युवकांमध्ये स्पर्धा होती. त्यामध्येही अनिलभाऊ देसाईंनी लवचीकता दर्शविली होती. दरम्यानच्या काळात रणजित देशमुख यांच्या उमेदवारीस गावातील त्यांचे पारंपारिक विरोधक नंदकुमार मोरे व मायणी चे जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रदादा गुदगे तर श्री. देसाई यांच्या उमेदवारीस माजी आमदार कै. सदाशिवराव पोळ (तात्या) यांचे सुपुत्र डॉ. संदिप पोळ व मनोज पोळ हे दोघे कितपत सहकार्य करणार या मुद्यावरुन चार दिवस चर्चेचा घनशाघोळ सुरु होता. अलिकडच्या काळात चानाक्ष राजकारणी म्हणून गणल्या गेलेल्या सुरेंद्रदादा व नंदुदादा या दोन दादांनी आघाडीच्या बैठकीकडे सोयिस्कर पाठही फिरविली होती. त्यामुळे उमेदवारी घोषित करण्यास अडचण निर्माण झाली होती.
दोन दिवसांपूर्वी ऐनवेळी प्रभाकर देशमुख यांच्या नावाने उचल खाल्ली. सातारा येथील शरद पवारांच्या दौर्यास मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे श्री. देशमुख हेही उत्साहीत झाले. त्यांना उमेदवारी घोषित होण्याची फक्त औपचारिकता बाकी राहिली होती. अश्या परस्थितीत आ. जयकुमार गोरे व शिवसेनेचे युवा नेते शेखरभाऊ गोरे यांना माण तालुक्यातूनच खमक्या पर्याय निघतोय हे लक्षात आल्याने गोरे विरोधकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.
मात्र पहिल्या टप्यात नाही म्हणून श्री. देशमुख यांनी आम्हास तोंडघशी पाडले. या कारणावरुन आत्तापर्यंत तयारी केलेल्या देसाई, देशमुखांनी पुन्हा वेगळा सुरु आळवायला सुरुवात केली आहे. तर मध्येच डॉ. येळगांवकरांच्या काही समर्थकांनी स्वत: डॉ. येळगांवकर यांनीच निवडणूक लढवावी. आम्ही त्यांचा स्वखर्चाने प्रचार करु असे पत्रक प्रसिध्द केले. याशिवाय रणजित देशमुख व पिंटू पैलवान यांच्यामध्ये खटावच्या अस्मितेबद्दल खलबत्ते सुरु झाले आहेत. यामुळे आपलं ठरलयं चा घट मुहुर्तावर बसणार का याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क केले जात आहेत.
दुसरीकडे युतीत ही मोठी रस्सीखेच
दुसर्या बाजूला माण मतदारसंघात युतीची उमेदवारी नक्की कोणाला मिळणार या मुद्यावरुन मोठी रस्सीखेच आहे. भाजपाची उमेदवारी आपणास मिळणार या दृष्टीने विद्यमान आमदार जयकुमार गोरे कामाला लागले आहेत. तर दुसर्या बाजूला शिवसेना या मतदारसंघावरचा आपला हक्क कधीच सोडणार नाही. असे परिवहन मंत्री दिवाकर रावते, संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे व इतर पदाधिकारी छातीठोकपणे सांगत आहेत. त्यामुळे युतीची उमेदवारी नक्की कोणत्या भाऊंना मिळणार याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
‘आपलं ठरलयं’ आघाडीच्या उमेदवारीची घटाच्या मुहुर्ताबाबत औत्सुक्य
RELATED ARTICLES