वडूज: माण विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांना खटाव माण सर्वपक्षीय विकास आघाडीच्या आमचं ठरलंय च्या टिमने पाठींबा जाहीर केला.
यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, प्रभाकर घार्गे, अनिल देसाई, रणजितसिंह देशमुख, डॉ. संदिप पोळ, संदिप मांडवे, सुरेंद्र गुदगे, काँग्रेसचे खटाव तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, माणचे अध्यक्ष एम.के. भोसले, अशोकराव गोडसे, माणचे सभापती रमेश पाटोळे, शेतकरी संघटनेचे अनिल पवार, सुनिल पोळ, बबनराव विरकर, बाजार समितीचे सभापती रविंद्र सानप, नामदेव पाटील, दिलीपराव डोईफोडे, डॉ.महादेव कापसे, प्रा. व्ही.डी.बाबर, दिलीप तुपे, मोहनराव बुधे, सत्यवान कमाने, यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. येळगावकर म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून खटाव माण तालुक्याची मोठी वाताहात सुरू झाली आहे. त्यामुळे या तालुक्यांना लागलेला कलंक पुसण्यासाठी खटाव माण तालुक्यातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते एकत्र आले आहेत, त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूकीत परिवर्तन अटळ आहे. आमचं ठरलंयमधील सर्वच पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांनी प्रभाकर देशमुख यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी आमदार घार्गे म्हणाले, माण-खटाव तालुक्यातील गुंडगिरी संपुष्टात आली पाहीजे, दहशत, गुंडगिरी माजविणार्या लोकांऐवजी सभ्य माणसे राजकारणात टिकली पाहीजेत. परिवर्तन झाले पाहिजे. यासाठी प्रभाकर देशमुख यांना खटाव माण सर्वपक्षीय विकास आघाडीच्या आमचं ठरलंय च्यावतीने पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबरोबर दोन्ही तालुक्यांतील लोकभावनाही तेवढीच संमत झाली आहे. त्यामुळे या निवडणूकीत प्रभाकर देशमुख यांचा चांगल्या मताधिक्क्यांनी विजय होणार असल्याचे निश्चीत झाले आहे. श्री. देशमुख यांच्यासारख्या सभ्य, मनमिळावू, अभ्यासू व दूरदृष्टीच्या व्यक्तीमत्वामुळे आगामी काळात दोन्ही तालुक्यांचा सर्वांगिण विकासाला चालना मिळण्यास निश्चीत मदत होणार आहे.
प्रभाकर देशमुख म्हणाले, खटाव माण तालुक्यांत परिवर्तन घडविण्यासाठी आमचं ठरलंयची सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते मंडळी पुढे सरसावली, आपणाला पाठबळ दिले. अनिल देसाई, रणजितसिंह देशमुख, संदिप मांडवे यांनी मोठे मन दाखविले.
आपणा सर्वांचा प्रतिनिधी म्हणून या निवडणूकीला सामोरे जात आहे. गेली दहा वर्षे येथील जनता गुंडगिरी, दहशत अश्या अन्याय्य घटना सहन करीत आहे. दोन्ही तालुक्यांत पाणी टंचाईची समस्या, सततच्या छावण्या, पाण्याचे टँकर पाचवीला पुजले आहेत.
या तालुक्याची होणारी वाताहात आतातरी थांबली पाहीजे ही आमचं ठरलंयच्या टीममधील प्रत्येकाची भावना आहे. दोन्ही तालुक्यांतील नेते,कार्यकर्त्यांनी व जनतेने आपणावर ही मोठी जबाबदारी सोपविली आहे. या निवडणूकीत केवळ आपण एकटे उमेदवार नसून येथील प्रत्येकजण उमेदवार आहोत या भावनेने काम करणार आहेत.
सकारात्मक विचार व विकासात्मक कामाच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्यांचे दैन्य हटावे यासाठी आपण निश्चीतच कटीबद्ध राहू. तालुक्याच्या विकासासाठी जनतेने सेवेची संधी द्यावी.
यावेळी रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, संदिप मांडवे, डॉ. संदिप पोळ, डॉ. विवेक देशमुख, एम.के.भोसले, अनिल पवार, अशोकराव बैले आदींची भाषणे झाली.नाना पुजारी यांनी स्वागत केले. अशोकराव गोडसे यांनी आभार मानले.
आमचं ठरलंय टीमचा अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुखांना एकमुखी पाठींबा
RELATED ARTICLES