वाई: काँग्रेस – राष्ट्रवादीकडे गेली 50 वर्षे सत्ता होती, विकासापेक्षा त्यांनी सत्ता, पदाला महत्व देत जनतेला झुलवत ठेवण्याचे काम केले त्यामुळे आजही अनेक योजना, प्रकल्प मार्गी लागले नाहीत. विद्यमान आमदारांनी या मतदारसंघाचे वाटोळे केल्याचा आरोप सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले. दरम्यान स्व. मदनराव पिसाळ (आप्पा) यांनी कधी राजकारण केले नाही, त्यांनी नेहमीच समाजकारणाला प्राधान्य दिले. ते माझे मार्गदर्शक असून त्यांच्या विचारानुसारच आपण काम करत असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले. बावधनमधील प्रचार सभेच्या आत्तापर्यंतच्या उपस्थितीचे रेकॉर्ड बुधवारी झालेल्या सभेने मोडीत निघाल्याचे उदयनराजे म्हणाले.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले, विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मदनदादा भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मदनदादा भोसले, माजी खासदार गजानन बाबर, विकासआण्णा शिंदे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, चंद्रकांत भोसले, भाजपचे अनिल जाधव, विजयसिंह नायकवडी, तानाजी मांढरेख शिवाजीबापू पिसाळ, चंद्रकांत जठार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, मी नेहमी विकासाला प्राधान्य देवून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. मी कधी खोट बोलत नाही. मात्र विरोधकांकडून खोट बोल पण रेटून बोल याप्रमाणे काम सुरु आहे. राष्ट्रवादीत असताना आम्ही आमच्यासाठी कधी काही मागितले नाही. माझ्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, जिल्ह्यातील प्रकल्प मार्गी लागले पाहिजे, धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले पाहिजे, शेतकरी राजा आर्थिक उन्नत झाला पाहिजे याच माझ्या मागण्या होत्या. मात्र माझ्या मागण्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केले. याऊलट भाजप सरकारच्या काळात जिल्ह्यातील अनेक योजना, कामे मार्गी लागली. मी विरोधात असतानाही त्यांनी कधी दुजाभाव केला नाही. त्यामुळे जे सरकार सर्वसामान्यांचे हित बघते त्या सरकारबरोबर राहण्यासाठी मी राजीनामा दिला. मात्र तरीदेखील विरोधक या मुद्याचे राजकारण करत असल्याने त्यांची मला कीव येते.
मदनदादा भोसले म्हणाले, सार्वजनिक जीवनात 40 वर्षाच्या काळात आजची बावधनची सभा न भूतो न भविष्यती अशी आहे. उयनराजेंच्या विजयाची आणि वाई विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे हे दर्शवणारी ही सभा आहे.
स्व. मदनराव पिसाळ (आप्पा) आणि एन. एम. कांबळे यांच्यामुळे बावधनची ओळख होती. आज श्री. छ. उदयनराजेंमुळे ही ओळख आणखी वाढली आहे. गेली दहा वर्षे तुम्ही ज्यांना संधी दिली त्यांनी नागेवाडीचे पाणी संपूर्ण शिवारात पोहोचवले नाही. नागेवाडीच्या कामांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता देवून निधीची तरतूद केली आहे. ज्यावेळेस मी सन 2003 -04 मध्ये किसनवीर कारखाना ताब्यात घेतला त्यावेळी कारखान्याची अवस्था बिकट होती. मात्र मी टिच्चून काम करुन आज किसनवीर, प्रतापगड, खंडाळा या तिन्ही कारखान्यांना चांगल्या स्थितीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मी मान्य करतो की ऊसाचा हप्ता द्यायला उशीर लागला मात्र महाराष्ट्राला सहकारात अभिमान वाटेल असेच काम होत आहे. किसनवीर कारखान्यावर बरीच वर्षे यांची सत्ता होती मात्र तरीही त्यांनी कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. ऊस लावू नका, कर्जे कारखान्यास देवू नका आदी प्रकारे अडचणी निर्माण करण्याचे काम विरोधकांनी केले. मात्र आम्ही कधी सहकारात राजकारण आणले नाही. संकटात सापडलेली सुतगिरणी चालवण्याचा ठराव किसनवीर कारखान्याने केला आहे.
या सभेत दशरथ राजपुरे, राजेंद्र राजपुरे, गणेश राजपुरे, शेखर राजपुरे, खानापूरचे माजी सरपंच नारायण गायकवाड यांच्यासह अनेकांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यमान आमदारांनी वाई मतदारसंघाचे वाटोळे केले: उदयनराजे भोसले
RELATED ARTICLES