ढेबेवाडी : माथाडी कायदा मोडीत निघेल असे काहीजण म्हणत होते, पण खर्या अर्थाने हा माथाडी कायदा मजबूत करण्याच काम या राज्य सरकारने केलेले आहे. माथाडी कामगारांसाठी जे निर्णय गेल्या 15 वर्षात घेतले गेले नाहीत ते निर्णय घेण्याचे धारिष्ठ्य आम्ही या सरकारच्या माध्यमातून दाखविले आहे. माथाडी हा समूह असून त्यांच्या पाठीशी सरकार कायम राहील, माथाडींच्या प्रश्नामध्ये राजकारण कधीच करणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई येथील माथाडी कामगार मेळाव्यात केले .
माथाडींचे आराध्यदैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 85 व्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगार मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पणनमंत्री सुभाष देशमुख हे उपस्थित होते प्रारंभी संघटनेचे सरचिटणीस, माजी आमदार आणि कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात अण्णासाहेबांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. नरेंद्र पाटील यावेळी म्हणाले कि, अण्णासाहेबांनी लावलेले माथाडी कामगार चळवळीचे हे रोपटे आज वटवृक्ष झाले त्यांच्या दृष्टीकोनातून उभ्या राहिलेल्या या संघटनेशी व माथाडी कामगारांशी मी कधीही गद्दारी करणार नाही माथाडी बरोबर मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी यापुढेही झटत राहणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची माथाडी कामगारांबद्दलची दूरदृष्टी मोठी आहे हा कायदा देशभर नेण्याचे काम ते करीत आहे त्यांची आजची उपस्थिती कामगार चळवळीला दिशा देणारी ठरली आहे असेही नरेंद्र पाटील यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये माथाडी कामगारांसाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा उहापोह केला. माथाडी कामगारासाठी काम करण्याची सरकारची इच्छाशक्ती आहे आणि इच्छाशक्ती असली कि कोणतेही काम पुर्ण करता येते. त्यामध्ये थोडी दिरंगाई झाली तरी अपयश येत नाही. माथाडींचा वडाळा- चेंबूर किंवा सिडकोतील घरांचा प्रश्न असो तसेच बोर्डाचा प्रश्न असो असे सर्व प्रश्न सकारात्मक दृष्टीकोनातून सोडविण्याच काम सरकार करणार आहे. माथाडीना नवीमुंबईत 5 हजार घरे सिडकोच्या माध्यमातून दिली जातील. निवृत्त कामगारांना केंद्राच्या आरोग्य योजनेत सामील करून घेतले जाईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माथाडींचे नेते नरेंद्र पाटील अध्यक्ष असलेल्या महामंडळामध्ये त्यांना कॅबिनेटचा दर्जा प्रदान केला जाईल असे भरभरून आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
माथाडी युनियनचे कार्याध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी नरेंद्र पाटील यांच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावरील नियुक्तीबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच सरकारने माथाडींच्या वडाळा- चेंबूर जागेचा प्रश्न आणि नाशिकच्या माथाडी कामगारांच्या लेव्ही बाबतच्या अडचणी दूर करण्याचे आवाहन केले. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याला उजाळा देत आमचे सरकार माथाडी चळवळीबरोबरच मराठा समाजाला पुढे नेण्यासाठी नरेंद्र पाटलांना साथ देईल अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन युनियनचे सचिव पोपटराव देशमुख यांनी तसेच आभार युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी केले. यावेळी आमदार प्रसाद लाड, मंदाताई म्हात्रे, किसान कथोरे, निरंजन डावखरे, संदीप नाईक, सिडकोचे अध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकूर, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, अण्णासाहेबांच्या धर्मपत्नी वत्सलाताई पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, नगरसेविका संगीता म्हात्रे, लता मढवी, सायली शिंदे, उषाताई पाटील, शुभांगी पाटील, डॉ. श्री.दे. नाईक, युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, संयुक सरचिटणीस वसंतराव पवार, आनंद पाटील, ऋषिकांत शिंदे, चंद्रकांत पाटील, युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, कायदेशीर सल्लागार व नगरसेविका अॅड. सौ. भारतीताई पाटील, माजी नगरसेवक मनोज जामसुतकर, माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकिय संचालक व सातारा जि.प.सदस्य रमेश पाटील, आदि मान्यवर तसेच युनियनचे सर्व पदाधिकारी व हजारो माथाडी कामगार उपस्थित होते.
माथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने केलेले आहे :- मुख्यमंत्री
RELATED ARTICLES