फलटण : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण शहरात शुक्रवारी मोठ्या भक्तीमय वातावरणात आगमन झाले. माऊलींच्या जयघोषाने फलटणनगरी दुमदुमली. मुक्कामासाठी पालखी सोहळा येथील विमानतळावर विसावला.
फलटण शहरात पालखीचे आगमन झाल्यानंतर जिंती नाका येथे फलटण नगरपरिषदेच्यावतीने पालखीचे स्वागत नगराध्यक्षा सौ.सारिका जाधव, उपनगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांच्या हस्ते व फलटण प्रांताधिकारी डॉ.विजयसिंह देशमुख, तहसिलदार अजित पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शहरातील आजी – माजी नगरसेवकांची उपस्थिती होती.
मुधोजी मनमोहन राजवाड्यासमोर पालखी सोहळा आल्यानंतर पालखीचे स्वागत व पूजन नाईक निंबाळकर घराण्याच्यावतीने सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. यावेळी श्रीमंत यशोधराराजे उदयसिंह नाईक निंबाळकर, जवाहर साखर कारखान्याचे (हुपरी) व्हा.चेअरमन विलासराव गाताडे, संचालक कुंडलिक वारंगडे, जयकुमार इंगळे, महादेवराव माने, मंगेशशेठ दोशी, अॅड.महेंद्र नलवडे, आबा पवार यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. फलटण एस.टी.आगाराच्यावतीने पालखी तळाच्या नजिक मुधोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात, सोमवार पेठ व कोळकी येथे वारकरी व भाविकांसाठी एस.टी.बसेसची सोय करण्यात आली होती. यामुळे वाहतुकीचा कोणताही अडथळा वारकर्यांना झाला नाही. सातारा जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्या आदेशानुसार फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे, पो.नि.प्रकाश धस, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि.अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी मार्गावर व शहरात सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. म.रा.वि.म.चे अभियंता देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे पालखी तळावर वारकर्यांची कोणतीही गैरसोय झाली नाही. पालखी तळावर वारकर्यांना पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करुन देण्यात आले होते.
दि. 8 रोजी एक दिवसाच्या मुक्कामानंतर पालखी बरडकडे प्रयाण करणार आहे.