Tuesday, December 2, 2025
Homeताज्या घडामोडीपाण्याचा नैसर्गिक स्त्रोत बंद झाल्याने पाचपुतेवाडीच्या ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न बनला गंभीर

पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत बंद झाल्याने पाचपुतेवाडीच्या ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न बनला गंभीर

वाई : अभेपुरी (ता. वाई) जवळील पाचपुते वाडी अतिशय दुर्गम भागात असून या गावाला वेरुळी मधल्या डोंगर कपारीतून मिळत असलेल्या नैसर्गिक स्त्रोतातून पिण्यासाठी गेले कित्येक वर्षे पाणी मिळत होते. वेरुळी मधल्या काही शेतकर्‍यांनी मुंबई पुण्यासारख्या शहरातील धनदांडग्यांना स्वमालकीच्या जमिनी विकल्या आहेत. त्यांनी चालू असलेले पाणी बोरवेल काढून बंद केल्याच्या निषेधार्थ पाचपुतेवाडी ग्रामस्थांनी वाईचे प्रांताधिकारी यांना वेरुळी भागात दंडेलशाही करणार्‍या धनदांडग्यांच्या विरोधात लेखी निवेदन देण्यात आले आहे,
निवेदनात असेही म्हटले आहे, जमिनीचे मालक बदलल्याने नवा राजा नवा कायदा सुरु झाल्या प्रमाणे ज्या धनदांडग्यानी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्या मालकांनी पाचपुतेवाडीच्या ग्रामस्थांना ज्या ठिकाणाहून नैसर्गिक रित्या पाणी मिळत होते, त्याच्या बाजूलाच बोर घेतल्याने येणारे पाणी बंद झाले. त्यामुळे पाचपुतेवाडीसह परिसरातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली, परिणामी पाचपुते वाडीतील ग्रामस्थांनी वेरुळीतील ग्रामस्थांची गाठ घेवून उद्भवलेल्या परिस्थितीची कल्पना दिली, परंतु वेरुळी भागातील जमिनी विकल्या गेल्याने नवीन मालकाने पाचपुतेवाडी ग्रामस्थांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली व दमदाटी करून त्यांना हुसकावून लावण्यात आले. पर्यायाने पाचपुतेवाडी ग्रामस्थांनी हे प्रकरण मानवी हक्क आयोगाकडे दाखल केले, मानवी हक्क आयोगाने पाचपुतेवाडी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्या नंतर त्याबाबत सुनावणी घेवून मानवी हक्क आयोगाने जिल्हाधिकारी यांच्या वतीने वाईचे तत्कालीन प्रांताधिकारी व भूजलतज्ञ यांना मुंबई येथे पाचारण करण्यात येवून मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष- बन्नुरमठसो यांनी पाचपुते ग्रामस्थांच्या बाजूनी निकाल देत पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत्र खंडित करणार्‍या बोरवेल बंद करून सील करण्याचे आदेश देण्यात आले. व तसा अहवाल देण्याचे आदेश वाई प्रांतांना देण्यात आले त्यांनीही त्याची काटेकोर अंमलबजावणी करीत सदरच्या जागेत काढलेले बोरवेल सील करून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला, तसा अहवाल मानवी आयोगाकडे सादर करण्यात आला. परंतु ज्या धनदांडग्यानी बोरवेल काढून पाण्याचा येणारा नैसर्गिक स्त्रोत बंद केला त्यांनीच पुन्हा दंडेलशाही करीत मानवी हक्क आयोगाचा निकाल धुडकावून लावीत पाचपुते वाडीकरांचा पाण्याचा स्त्रोत्र बंद करून या भागातून कधीही पाणी मिळणार नाही असा जणू फतवाच काढून पाचपुतेवाडीच्या ग्रामस्थांना दमदाटी करण्यात आली. तसेच त्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय काढून एक प्रकारचा पाचपुते वाडी ग्रामस्थांवर अन्याय करण्यात येवून कोर्टाचाही अवमान करण्यात आला आहे. तसेच या धनदांडग्यानी पाचपुतेवाडी ग्रामस्थ धोम धरणातून पाणी घेत असून त्यांना या नैसर्गिक स्त्रोत्राची गरज नाही असा खोटा अहवाल जिल्हाधिकार्यांकडे दाखल करून प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सध्या या गावांमध्ये धोम धरणातून खडुळ पाण्याचा पुरवठा होत असून ते जनावरांसुध्दा पिण्या लायक नाही,तरी प्रांताधिकारी यांनी स्वतः धोम धरणातील पाण्याची परिस्थिती पाहून पाचपुतेवाडीकरांनान्याय द्यावा व वेरुळी येथील पिण्याच्या पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत्र पुन्हा पूर्ववत करून द्यावा अन्यथा पाचपुतेवाडी व अभेपुरी परिसरातील ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर ग्रामस्थ- वसंत चव्हाण, मधुकर मोरे, भगवानराव मांढरे, संजय पाचपुते, बळवंत पाचपुते यांच्या सह शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular