महाबळेश्वर ः प्लास्टिक मुक्त महाबळेश्वर संकल्पना साकारण्यासाठी पालिकेने 1 वर्षापुर्वीच प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पालिका आता सज्ज झाली आहे. आज पासुन प्लस्टिक कॅरीबॅग अथवा थर्माकोलच्या वस्तु यांचा वापर विक्री साठा वितरण यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जर व्यापारी वर्गाकडे प्लस्टिक पिशव्या अथवा थर्माकोलच्या वस्तु असतील तर त्या पालिकेत जमा कराव्या असे आवाहन नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी केले आहे.
महाबळेश्वर हे पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशिल आहे त्या मुळे इतर शहरापेक्षा येथे होणारा प्लास्टिक कचरा पर्यावरणासाठी प्रचंड घातक आहे. हे लक्षात घेवुन पालिकेने मागील वर्षी 27 जानेवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेत महाबळेश्वरात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या कडक अंमलबजावणी नंतर काही अडचणी येतील हे लक्षात घेवुन पालिकेने प्लास्टिक कॅरीबॅगला पर्याय असलेल्या कागदी व कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण बचत गटातील महीलांना देण्याची सोय केली. अनेक बचत गटांनी आता कापडी पिशव्या व कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण पुर्ण केले आहे. या बचत गटांनी तयार केेलेल्या कागदी व कापडी पिशव्या पालिकेने विक्रिसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. अशी तयारी जिल्हयातील एकाही पालिकेने केली नसल्याचे सांगुन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पालिकेचे कार्यक्रमात विशेष कौतुक केले होते. महाबळेश्वर पालिकेने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्या नंतर काही महीन्यांनी राज्य शासनानेही राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. आता या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात केली जाणार आहे. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पालिकेने पाउल उचलण्याची तयारी केली आहे. आता या पुढे महाबळेश्वरात कोणालाही थर्माकोलच्या वस्तु प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर विक्री साठा अथवा वितरण करता येणार नाही. ज्यांच्याकडे ग्लास , प्लेट,चमचे, कप, पिशव्या अशा वस्तुंचा साठा असेल त्यांनी तो पालिकेच्या ताब्यात दयावा असे आवाहनही नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी बाजारपेठेतील दुकानदार हातगाडी खादयपदार्थ विक्रेते रेस्टॅारंट पानटपरी गोळा व आईसक्रिम विक्रेते यांना केले आहे. जर या नियमांचा भंग करताना कोणी सापडला तर प्रथम त्यास पाच हजार रूपयांचा दंड दुसरेवेळी दहा हजारांचा दंड आणि तिसर्या वेळा जर सापडला तर पंचवीस हजार रूपये दंड व तीन महीन्यांचा कारावास अशी शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे आणि याची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्धार पालिकेन व्यक्त केला आहे.
सहलीसाठी येथे येत असलेल्या पर्यटकांनाही या बाबत नाक्यावरच सुचना देण्यात येणार आहे. त्यांना आपला ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करून तो पालिकेच्या कचरापेटीत टाकण्याच्या सुचना देण्यात येणार आहे. लवकरच नाक्यावर पर्यटकांना या साठी दोन बॅग देण्यात येणार आहे. या बॅग देताना पर्यटकांकडुन काही रक्कम अनामत म्हणुन घेण्यात येणार असुन सहली वरून परत जाताना या दोन बॅग पुन्हा नाक्यावर परत दिल्यानंतर त्यांनी दिलेली अनामत रक्कम त्यांना परत देण्यात येणार आहे. या योजनेला शहरात लवकरच लागु करण्यात येणार असल्याची माहीती नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी दिली.
महाबळेश्वरात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे ; प्लास्टिक कॅरीबॅग, थर्माकोल या वस्तूंच्या वापरावर दंडात्मक कारवाई केली जाणार
RELATED ARTICLES

