Thursday, April 24, 2025
Homeसातारा जिल्हाकोरेगावसातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची तुतारी फुंकणारे सेलचे पदाधिकारी बाजूला...

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची तुतारी फुंकणारे सेलचे पदाधिकारी बाजूला…

(अजित जगताप)
सातारा दि: सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी मार्गावर घेऊन जाण्याइतकी भक्कम बाजू मांडणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे मागासवर्गीय विभाग जिल्हाध्यक्ष श्री रमेश उबाळे यांनी पक्षाला रामराम केला. त्यानंतर आता वाहतूक संघटना व असंघटित कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा त्याग करून इतर पक्षांमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीमध्ये प्रचारानिमित्त तुतारी फुंकणारी सेलचे नेतेगण पक्ष सोडून जात असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंतर्गत चालले काय? असा प्रश्न आता राजकीय विश्लेषकांना भेडसावू लागलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलच
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष संतोष ननावरे व वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष संजय पिसाळ व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला .कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नामदार श्री महेश शिंदेसाहेब यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. तुतारी ऐवजी धनुष्यबाण हाती घेतलेले आहे. या सर्व घडामोडी एका रात्रीत घडलेल्या नाहीत तर त्याला बराच अवधी लागला.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी काँग्रेस व इतर पक्षात काम करणाऱ्या अनेकांनी जेष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांवर विश्वास ठेवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक व ग्रामीण भागातील सोसायटी ,ग्रामपंचायत व इतर निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाला चितपट केले. अशा कार्यकर्त्यांना सातारा जिल्ह्यात पक्षीय पातळीवर पद दिले असले तरी सत्तेमध्ये सामावून घेतले जात नव्हते. याची त्यांच्या मनात खंत कायम होती. परंतु, पक्षाचे ध्येय धोरण कधीतरी सामान्य माणसाच्या कामी येईल या आशेपोटी ते पक्षात थांबले होते.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्ष वाढीसाठी ज्यांनी प्रयत्न केले ते पक्ष सोडून गेले पण सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत राहून नवीन चिन्ह खेड्यापाड्यात पोहोचवण्यासाठी हाती तुतारी घेऊन फुंकत होते. त्यांच्या ऐवजी आलिशान वाहनातून फिरणारे व ठेकेदारी मध्ये माहीर असणाऱ्याच लोकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट मधील काही नेतेगण वागत होते. त्यामुळे कमी जास्त प्रमाणात मते पडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. या पराभवला जबाबदार असणारे आजही त्यांच्या सोबत आहेत. तर ज्यांनी निकाराची लढत दिली. त्यांच्यावर दूजाभाव होऊ लागला. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागासवर्गीय सेल जिल्हा अध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांच्या नंतर संजय पिसाळ, संतोष ननावरे यांनी सुद्धा पक्ष सोडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनाधार दिवसेंदिवस कमी होत असल्याने वरिष्ठ नेत्यांनी त्याबाबत आत्मचिंतन केले पाहिजे.
विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही कार्यकर्त्यांनी लढण्याऐवजी शस्त्र खाली ठेवून दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत. त्यांना सामावून घेऊन त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे राजकीय अन्याय होणार नाही. यासाठी खबरदारी घेणार असल्याचे शिवसेना व रिपब्लिक पक्षातील नेत्यांनी शब्द दिलेला आहे. अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातील नाराज मंडळी विधानसभेच्या तोंडावर पक्ष सोडण्याची चिन्ह दिसू लागलेले आहेत. जर सेनापती निघून जात असतील तर सैन्य फार काळ लढाई लढू शकत नाही. याची जाता चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू झालेली आहे. दरम्यान, महायुतीमध्ये सर्वांना सन्मान देऊन त्यांना योग्य ते न्याय देऊ. अशा शब्दात वरिष्ठ नेत्यांनी त्यांना दिलासा दिलेला आहे. या उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी फोन न उचलता आपली मुख प्रतिक्रिया नोंदवली आहे.

————————————— ……… ……. फोटो सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश केलेले कार्यकर्त्यांचे स्वागत करताना आमदार महेश शिंदे साहेब (छाया- निनाद जगताप सातारा)

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular