(अजित जगताप)
सातारा दि: गेले १७ वर्ष शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्या नंतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शासकीय सेवेत असणाऱ्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले .एकच मिशन.. जुनी पेन्शन … असा जयघोष करून पावसाच्या सरी कोसळत असताना घोषणांचा ही पाऊस पाडला .
दि. १ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याची मागणी संघटनेद्वारे अनेकदा केली आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दीड लाख कर्मचाऱ्यांनी पेन्शन संकल्प यात्रा काढली होती. जुनी पेन्शन विधेयक नकारात्मक धोरणाचा निषेध केला होता. त्यानंतर राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांनी मार्च. २०२३ रोजी बेमुदत संप केला होता. जुन्या पेन्शनची मागणी केली होती. सदर मागणी नंतर शासनाने समिती स्थापन करून तीन महिन्यात निर्णय घेऊ असे आश्वासित केले होते. त्यानंतर १२ डिसेंबर २०२३ ला नागपूर येथे विधानभवनावर ३ लाख कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पेन्शन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला. त्यावेळेला जुन्या पेन्शनच्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून जुने पेन्शन लागू करण्याचा पुढील आर्थिक अधिवेशनात निर्णय घेऊ. असेही आश्वासित केले होते.
जुन्या पेन्शनची समिती शिफारशीनुसार जी. पी. एस. नावाची नवीन पेन्शन योजना समितीने प्रस्तावित केली आहे. परंतु ,ही योजना फसवी असल्याचे प्रथम दर्शनी लक्षात आले आहे. त्याचाही निषेध करण्यात आला. राज्यात जुनी पेन्शन ऐवजी जी.पी.एस. किंवा अन्य कोणती योजना आणणे किंवा लागू करणे हे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचे भविष्य उध्वस्त करणारे आहे. त्यामुळे शासनाच्या विरोधात राज्य कर्मचारी व प्राथमिक शिक्षक नाराज झालेले आहेत. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमाप्रमाणे जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी. अशी मागणी करून अनेकांनी याबाबत वस्तूनिष्ठ व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणाऱ्या आर्थिक टंचाई बाबत सविस्तर माहिती दिली. प्रत्येकांच्या गांधी टोपीवर एकच मिशन… जुनी पेन्शन.. अशी घोषणा लिहिलेली होती. यामध्ये चिमुकले सुद्धा सामील झाले होते.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलकांनी शांततेत आंदोलन केले . कोणत्याही प्रकारे सर्वसामान्य माणसांना अडचण येऊ दिली नाही. वाहतुकीस अडथळा होऊ नये. याची काळजी घेतल्याबद्दल या सर्व आंदोलकांचे मनापासून पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष रमेश अनिल उबाळे व शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते तसेच व्यापारी संघटनेच्या वतीने अजित निकम, प्रशांत पवार यांनी मनापासून आभार मानले. या आंदोलनाच्या वेळेला प्राथमिक शिक्षिका रेखा कसबे, वैशाली पवार, प्रकाश कदम, रितेश गायकवाड, अविनाश करपे, अमोल जाधव, प्रवीण तरटे ,महेंद्र सावर्डेकर यांच्यासह अनेक शासकीय कर्मचारी व प्राथमिक शिक्षक उपस्थित होते. सातारा पोलिसांनी कुठेही वाहतुकीस अडथळा होऊ दिला नाही. चांगल्या पद्धतीने काम केले त्याबद्दल अनेक वाहन चालकांनी त्यांना धन्यवाद दिले.
….. ………………..
फोटो- सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करताना शासकीय कर्मचारी (छाया- निनाद जगताप, सातारा)