मुंबई : सातारा येथे मे महिन्यात होणारा राजधानी महोत्सव अत्यंत दिमाखात आणि मान्यवरांच्या उपस्थितीने भव्य होणार हे आज स्पष्ट झाले. खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आज दिलेले निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारत कार्यक्रमाला येण्याबाबत दुजोरा दिला. त्याचप्रमाणे या महोत्सवाला छत्रपती घराण्याचा मनाचा शिवसन्मान पुरस्कार प्राप्त महानायक अमिताभ बच्चन तसेच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याबाबतचा दुजोराही आज मिळाला.
खा श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज मुंबई यथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली, मुख्यतः सातारा येथे होणार्या राजधानी महोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी खासदार वर्षावर गेले, यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम स्वीकारत, या निमित्ताने आपल्याला पुन्हा सातारा येथे यायला आवडेल असे उदगार काढले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती घेत मुख्यमंत्र्यांनी राजधानी महोत्सवाच्या भव्य आयोजनाबद्दल कौतुकही केले.
वर्षा येथे दोन्ही नेत्यांनी सुमारे तासभर अनेक विषयांवर चर्चा केली. 25 ते 27 मे दरम्यान राजधानी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, 27 मे रोजी सायंकाळी छत्रपती घरण्याकडून देण्यात येणार्या शिव- सन्मान पुरस्कारासाठी मुख्यमंत्री आणि महानायक अमिताभ बच्चन सोबतच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवथरे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मुंबईतील वर्षा तसेच इतर भेटीवेळी राजधानी महोत्सवाचे आयोजन पंकज चव्हाण,सुनील काटकर,अशोक सावंत, काका धुमाळ, संग्राम बर्गे उपस्थित होते.