जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन स्थळी चूल पेटवून भाजप सरकारचा निषेध करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी.
सातारा : दोन कोटी युवक-युवतींना रोजगार देऊ अशी घोषणा करणारे भाजप सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. देशात वाढत चाललेल्या बेरोजगारी बद्दल केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस व महिला आघाडीतर्फे आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या नियोजनशून्य व निष्क्रिय कारभारामुळे देशात व राज्यात बेरोजगारीचा उच्चांक झाला आहे. बेरोजगारांची टक्केवारी इतिहासात नोंद होईल इतकी झाली आहे. दोन कोटी युवकांना रोजगार देऊ अशी घोषणा मोदी सरकारने त्यांना दिली होती. हे आश्वासन पूर्ण करण्यात राज्यातील व केंद्रातील सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, त्यामुळे या दोन्ही सरकारचा निषेध केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, देशांमध्ये भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी युवकांना नोकर्या देण्याचे आश्वासन दिले होते. आज प्रत्यक्षात आयोगाने दिलेल्या अहवालात देशात बेरोजगारी इतिहासात नोंद होईल अशी निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे. भाजपसरकार मुळे सर्वसामान्य लोकांची निराशा झाली आहे. सामान्य, कष्टकरी, शेतकरी, विद्यार्थी देशोधडीला लागले आहेत. धनगर आरक्षणाचा प्रश्न असो अथवा मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्ताधारी केवळ आश्वासन देत आहेत. महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तरुण पिढीला बरबादी पासून वाचण्यासाठी राज्यातील डान्स बार बंद केले होते मात्र भाजपा सरकारला डान्सबार बाबत न्यायालयात भूमिका स्पष्ट न करता आल्याने आज राज्यात डान्सबार सुरू झाले आहेत. देशात आणि राज्यात आघाडी शासनाचे सरकार असताना 400 ते 450 रुपयात गॅस सिलेंडर मिळत होता. आज तो सिलेंडर 800 रुपयांवर पोहचल्यामुळे महिलांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तेजस शिंदे म्हणाले, साडेतीन ते चार वर्षापूर्वी बेरोजगारीचे प्रमाण 2 टक्यावर होते आज ते 6.5 टक्क्यावर पोहोचल्याने देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येते. वाढती महागाई, बेरोजगारी यासारखे अनेक मुद्दे उपस्थित झाल्याने आगामी निवडणुकीमध्ये सत्ताधारी सरकारला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आंदोलनात सुनील माने, तेजस शिंदे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव चव्हाण यांच्यासह शेकडो लोक सहभागी झाले होते.
चूल पेटवून निषेध
गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य गृहिणींची मोठी अडचण झाली आहे. 400 रुपये मध्ये मिळणार सिलेंडर 800 रुपयांवर पोहोचल्याने ग्रामीण भागातील महिलांना आता चूल पेटवळल्या शिवाय पर्याय नाही, त्यामुळे आंदोलनाच्या प्रारंभीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी चूल पेटवून मोदींचे पकोडे मोदींनाच द्या अशा जोरदार घोषणा दिल्या.
राष्ट्रवादीचे बेरोजगारीच्या निषेधार्थ सातार्यात धरणे आंदोलन
RELATED ARTICLES

