फलटण : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांना भारतीय पत्रकार संघाचा बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कारफ जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण बुधवार, दि. 1 मे 2019 रोजी दुपारी 4 वाजता औरंगाबादकर सभागृह, नाशिक येथे होणार आहे, अशी माहिती भारतीय पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी दिली.
कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देताना महेंद्र देशपांडे यांनी सांगीतले की, भारतीय पत्रकार संघातर्फे प्रतिवर्षी राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्काराने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवरांना गौरवण्यात येते. यंदाच्या कार्यक्रमास लोकप्रिय अभिनेते अभिजीत खांडकेकर, अशोका बिल्डकॉनचे अशोकज कटारिया, नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे – पाटील, महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, निमा, सातपूरचे अध्यक्ष हरीशंकर बॅनर्जी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
रविंद्र बेडकिहाळ हे राज्यातील दै.लोकसत्ता, नवशक्ती, तरुण भारत अशा विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, 50 हून अधिक वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक यामधून स्तंभलेखन, अनेक कथा, कविता, वैचारिक लेखन, स्वत:चे सा.लोकजागर वृत्तपत्रातून गेली 37 वर्षे संपादन, अशा प्रकारे गेली 51 वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत.
राज्यातील आपद्ग्रस्त, गरजू पत्रकार व त्यांचे कुटुंबिय यांना त्यांचेवरील आपत्तीप्रसंगी तातडीने वैद्यकीय व आर्थिक मदत देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या राज्यातील पहिल्याच स्वायत्त अशा विश्वस्त संस्थेची 32 वर्षांपूर्वी स्थापना, त्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे 350 गरजू पत्रकारांना तातडीने अर्थसहाय्य. 250 ज्येष्ठ व गुणवंत, संपादक, वार्ताहर यांचा राज्यात 25 वर्षापूर्वी प्रथमच सुरु केलेल्या प्रतिष्ठेच्या दर्पण पुरस्काराने सन्मान, आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या मराठी वृत्तपत्रसृष्टीतील पहिल्या स्मारकाची त्यांच्या जन्मगावी पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे उभारणी व त्या गावाला इतिहासात प्रथमच जांभेकर स्मारकापर्यंतच्या 3 कि.मी. (3 कोटी रु. चा) रस्त्याचे काम, या स्मारक सभागृहात दरवर्षी 6 जानेवारी, पत्रकार दिन व 17 मे जांभेकर पुण्यतिथी कार्यक्रमात गेली 26 वर्षे सातत्य. जांभेकरांचे शैक्षणिक योगदान लक्षात घेऊन राज्यातील त्यांचे पहिले शैक्षणिक स्मारक म्हणून फलटण, जि.सातारा येथे 1997 पासून आचार्य बाळशास्त्री जांभेकर हायस्कूल सुरु. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या समग्र चरित्राचे प्रकाशन व लघुपटाची निर्मिती, राज्यात विभागवार पत्रकारांसाठी कार्यशाळा, शिबिरे आयोजन, त्यांच्याच नेतृत्त्वाखाली असलेल्या महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक सहकारी संघ व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थांच्या प्रयत्नाने राज्यातील सर्व शासनमान्य यादीवरील वृत्तपत्रांना शासनाकडून 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त जांभेकरांना अभिवादन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती, राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विशेष जाहिरात मंजुरी, शासकीय रुग्णालयामधून शासकीय अधिस्वीकृतीधारक पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना मोफत तपासणी व औषधोपचार, महाराष्ट्र शासनातर्फे नुकत्याच कार्यान्वित केलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतून गरजू ज्येष्ठ शासकीय अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दरमहा 10,000/- सन्मान मानधन देण्यासाठी गेली 30 वर्षे शासनात यशस्वी लढा, ग्रामीण भागातील पत्रकारांना शासकीय अधिस्वीकृती पत्रिका मिळण्याबाबत, नवीन वृत्तपत्रे सुरु करण्याबाबत, वैद्यकीय मदतीबाबत सातत्याने मार्गदर्शन, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य (सातारा जिल्हा प्रतिनिधी) या माध्यमातून गेली 15 वर्षे सातारा जिल्ह्यात 8 नवीन शाखा सुरु, फलटण येथे गेली 7 वर्षे राज्यात प्रथमच यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन, साहित्य संमेलने खेड्यात, बांधावर व शिवारात जावीत यासाठी शिवार साहित्य संमेलन उपक्रम सुरु. नवोदित लेखक, कवी यांचेसाठी मार्गदर्शन व प्रोत्साहनात्मक कार्यक्रमाचे नियोजन, प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृति व्याख्यानमालेच्या संयोजनात गेली 8 वर्षे पुढाकार, भारती विद्यापीठ नियामक मंडळ सदस्य, रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे सदस्य, महात्मा एज्युकेशन सोसायटी फलटणचे संस्थापक कार्यवाह, लोकजागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशा प्रकारे पत्रकारिता, शैक्षणिक, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात रविंद्र बेडकिहाळ यांचे गेली 51 वर्षे योगदान आहे.
त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेवून भारतीय पत्रकार संघाकडून त्यांना बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचेही महेंद्र देशपांडे यांनी सांगीतले.
बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रविंद्र बेडकिहाळ यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांना बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर
RELATED ARTICLES