
म्हसवड : मुंबई चुनाभट्टीहुन काळचौंडी, ता.माण येथे काळभैरव या ग्रामदैवताची जत्रा करण्यासाठी रविवारी डॉ. यशवंत पांडुरंग माने हे कुटुंबियासह गावी आले होते. दिवसभर जत्रेचा कार्यक्रम उरकून रात्री 11 वाजता मुलीला मायणी येथे कॉलेजमध्ये सोडून पुन्हा मुंबईला जाण्यासाठी परतीचा प्रवास करत असताना डॉ.मानेसह पत्नी व एकलुता मुलगा यांच्या गाडीला अपघात झाला व या कुटुंबासाठी ही रात्र काळरात्र ठरली असून या अपघाताने डॉक्टरांनी अतिशय कष्टाने गरिबीवर मात करून वैभव उभे केले होते. देवाची जत्रा करण्यासाठी आलेल्या कुटुंबावर दैवाने घाला घातल्याने हे संपुर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेल्याने माण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
माण तालुक्यातील काळचौंडी गाव हे तालुक्यातील कायमच्या दुष्काळा पासून अपवाद नव्हते. हे गाव दुष्काळाच्या झळा सोसत होते. या भागात शेती हा व्यावसाय करणे म्हणजे जुगारा खेळण्यासारखेच समजले जाते. बेभरवासाच्या शेती व्यवसाय करून तालुक्यीतील अनेक कुटुंब डबघाईला आली आहेत. या पैकी काळचौंडीचे पांडुरंग माने यांचे कुटुब होते.त्यांनी आपल्या तीन मुलाना अतिशय गरिबीतून शिक्षण दिले होते.पैकी यशवंत याने खडतर परिश्रम घेऊन शिक्षण पुर्ण केले व गावाकडे राहून प्रगती करता येणार नाही.म्हणून त्यांनी पॅथालॉजीचे शिक्षण घेऊन मुंबई चुनाभट्टी येथे पॅथालॉजीची ओपीडी सुरू केली. या व्यवसायामध्ये त्यांनी तन मन धन अर्पण करून रात्रीचा दिवस करून वैभव निर्माण केले होते.
डॉ. यशवंत माने यांनी नावाप्रमाणे व्यवसायात यशवंत होऊन प्रगती केली होती. परतु गावाच्या मातीला ते कधीच विसरले नाहीत. तर त्यांनी जे भोगले ते मुलांना भोगायला लागू नये मुलाना चांगले शिक्षण मिळावे म्हणून ते नेहमी आग्रही असत त्यांची मुलगी कु.शुभांगी ही मायणी ता. खटाव येथे मेडीकलच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे तर मुलगा 12 मध्ये मुंबई येथे शिकत होता.
हे कुटुब रविवारी काळचौडी येथे ग्रामदैवत काळभैरवाची जत्रा करण्यासाठी आले होते. दिवसभर भावकीसह येणार्या पाहुण्यांची जातीने उठबस केली आग्रहाने जेवणावळी उठवल्या. सौ.शारदा माने यानी मार्गशिर्ष महिना असल्याने देवाची जत्रा असल्याने मांसाहार केले नव्हते. दिवसभर कार्यक्रम उरकून सर्व गावकर्यांचा व पाहुण्यांचा निरोप घेऊन हे कुटुब रात्री मायणी, ता. खटाव मेडीकलच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या मुलीस सोडले. मुलगी मुंबईला परत येण्याचा हट्ट करत होती. परतु शेवटचे वर्ष आहे. अभ्यास बुडू नये म्हणून तिला मायणीत ठेवले व तिघे जण तिला तेथेच सोडून मुंबईच्या दिशेने प्रवास करू लागले पुण्याजवळ गेल्यानंतर मुलगा गाडी चालवत असताना एका ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली व हे कुटूंब जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडल्याने माण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.