वाई ः समाजातील निराधार, अपंग, विधवा, उपेक्षितांना आर्थिक मदत करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे तसेच वृध्दांना कोणासमोरही हात पसरण्याचा यातनामय प्रसंग येवू नये म्हणून कृतीशील प्रयत्न जागतिक साळी फाउंडेशनचे संस्थापक विजय वक्ते व फौंडेशनच्या प्रमुख विश्वस्त सौ. निशा वक्ते यांच्याकडून सुरू असून अशा स्वरुपाची ज्या समाजबांधवांना मदत हवी आहे त्यांनी समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संपर्क करावा, असे आवाहन प्रा. मो. नी. ठोके यांनी केले.
जागतिक साळी फाऊंडेशनच्या अंतर्गत 23 फेब्रुवारी 2019 रोजी घेण्यात येणार्या स्वकुळ साळी समाजाचा जागृती मेळाव्याच्या नियोजनासाठी समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सातारा येथे रविंद्र कांबळे यांच्या हॉलमध्ये पार पडली. यावेळी प्रा. ठोके बोलत होते. अध्यक्षस्थानी कराड शहर स्वकुळ साळी समाजाचे अध्यक्ष अशोकराव कांबळे होते.
अध्यक्षीय भाषणात अशोकराव कांबळे म्हणाले, साळी समाज अजूनही जागा झालेला नाही. साळी समाजाच्या दृष्टीने हे योग्य नाही. जागतिक साळी फाउंडेशनच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कृतीशील कार्यापासून प्रेरणा घेऊन सातारा जिल्हयाचा नियोजित जागृती मेळावा एकदिलाने पार पाडण्याचे, आवाहन त्यांनी केले.
शशिकांत आमणे यांनी एसबीसी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षाची माहिती दिली. तसेच विश्वासराव ठोके (सातारा), दत्ता मर्ढेकर, (वाई), प्रभाकर पांढरपट्टे (जानुगडेवाडी), रविंद्र सावेकर (अतीत) यांनीही समाजाच्या विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
डॉ. जयवंत ठोके व सौ. शैला ठोके यांनी यावेळी सर्व रोग मोफत तपासणी शिबीर घेणार असल्याचे सांगितले. यावेळी विविध समित्यांची स्थापना करून सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात अशोकराव कांबळे, अनिल बोंद्रे, सौ. तिलोत्तमा बडे (कराड), प्रभाकर पांढरपट्टे, अधिक सागावकर (पाटण), भास्करराव कांबळे, कुमार गवते, स्वप्नील दाहोत्रे (वाई), पांडूरंग बिचकर, धनंजय शिंगारे, उमेश घटे, सुरेश पांढरपट्टे (सातारा), संजय डांगरे (खंडाळा) यांचा समावेश आहे. जिल्हयाची पुढील बैठक रविवार दि. 6 जानेवारी 2019 रोजी दुपारी 2 वाजता होणार असल्याचे मधुकर जंत्रे यांनी सांगितले.
प्रारंभी कराडच्या कार्यकर्त्या सौ. तिलोत्तमा बडे यांच्या हस्ते भगवान जिव्हेश्वरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
सातारा शहरचे अध्यक्ष मधुकर जंत्रे यांनी स्वागत केले. सुभाष पांढरपट्टे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेष पागडे, छत्रपती डांगरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
साळी फाऊंडेशनच्या वतीने साळी समाजाच्या जागृती मेळाव्याचे आयोजन
RELATED ARTICLES