सातारा :- आजची सामाजिक परिस्थिती वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहे. आपल्या कुटूंबातील,परिसरातील थोरामोठ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे जरुरीचे बनले आहे. सप्ततारा जेष्ठ नागरिक संघ समाजातील घटकाची नाळ समजून सामाजिक कार्य करत आहे. अशा संघामुळे सामाजिक जाणिव निर्माण होते.त्यामुळे सप्ततारा जेष्ठ नागरिक संघाचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी केले.
येथील यादोगोपाळ पेठेतील सप्ततारा जेष्ठ नागरिक संघातर्फे क्रांती दिनानिमित्त मोफत मधुमेह व नेत्ररोग तपासणी शिबीर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार शरद काटकर, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, सप्तताराचे मार्गदर्शक विनोद कुलकर्णी,
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, माजी उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे, सप्ततारा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बापूसाहेब उथळे, अतुल जोशी, मेघा भोसले, संतोष शिरखाने आदी मान्यवर उपस्थित होते.
गजानन राजमाने म्हणाले, सप्ततारा जेष्ठ नागरिक संघाचे कार्य कौतूकास्पद आहे.जेष्ठ नागरिक संघ सगळीकडे सुरू झाले तर समाजात वृद्धाश्रमांची गरज पडणार नाही.या पुढेही असेच उपक्रम राबवून समाजातील सर्व स्थरातील व्यक्तींना बरोबर नेण्याचे काम सप्तताराने अविरत ठेवावे.समाजाला आज एकसंघ ठेवण्याची गरज असून लोकमान्य टिळकांनी घालून दिलेल्या आदर्शप्रमाणे मंडळाची वाटचाल आनंददायी आहे, असे त्यांनी सांगितले.
शरद काटकर म्हणाले, गेली 20 वर्षे मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली आहे.त्यांचा आदर्श इतर मंडळांनी घ्यावा.सप्ततारा मंडळाचे उपक्रम दिशादर्शक असून यापुढे असे उपक्रम राबवावेत.आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विनोद कुलकर्णी म्हणाले, कोणत्याही पदावर नसताना राजू गोडसे यांनी सप्तताराच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे.त्यांनी आजपर्यंत विविध उपक्रम राबवले आहेत.मोफत आरोग्य तपासणी घेऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे,असे मत व्यक्त केले. गजानन राजमाने यांच्या हस्ते शिबिरास बहुमूल्य सहकार्य केल्याबद्दल कुलकर्णी मेमोरियल आय केअरच्या डॉ.मेघा घाडगे, डॉ.राजळे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच लायन्स क्लब गेंडामाळच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल संतोष शिरखाने यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सप्ततारा सांस्कृतिक मंडळ व मित्र समूह, सप्ततारा महिला बचतगट, सप्ततारा जेष्ठ नागरिक संघ, कुलकर्णी मेमोरियल आय केअर सेंटर, राजधानी टॉवर व सातारा जिल्हा बालविकास समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
सप्ततारा जेष्ठ नागरिक संघाचे कार्य कौतुकास्पद : गजानन राजमाने
RELATED ARTICLES