सातारा: गेल्या दोन- तीन वर्षांपासून सातार्यात बॉक्सिंग खेळाचा खूपच महत्व मिळत आहे. सातारा बॉक्सिंग अकॅडमीने तंत्रशुध्द बॉक्सिंग सातार्यातील खेळाडूंसाठी उपलब्ध करुन दिल्याने या अकॅडमीतील खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चकमत आहेत. अकॅडमीच्या खेळाडूंमुळे सातार्याचे नाव देशपातळीवर झळकत असून सातारा बॉक्सिंग अकॅडमीन सातार्याचा नावलौकिक वाढवला आहे, असे गौरवोद्गार कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी काढले.
सातारा येथे नुकत्याच झालेल्या याज्यस्तरीय युथ बॉक्सिंग स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या अभिषेक कदम (75 ते 81 किलो वजनगट) आणि आदर्श कांबळे (91 किलो वरील वजनगट) या दोघांनी रौप्य पदक पटकावले. मधूर भोसले याने वेस्ट झोन नॅशनल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. तसेच अकॅडमीचा खेळाडू विनोद राठोड याने नेताजी सुभाषचंद्र बोस नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ स्पोर्टस मार्फत बॉक्सिंग प्रशिक्षण कोस यशस्वीपणे पुर्ण केला. या चौघांचाही सौ. वेदांतिकाराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अकॅडमीचे पदाधिकारी रविंद्र होले आणि अमर मोकाशी उपस्थित होते.
आयबा मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप यांचे तंत्रशुध्द प्रशिक्षण सातारा बॉक्सिंग अकॅडमीतील खेळाडूंना लाभत आहे. जगताप यांच्या सारख्या प्रशिक्षकामुळेच चांगले बॉक्सर सातार्यात घडत आहेत. सातारा बॉक्सिंग अकॅडमीमुळे साताराच नव्हे तर महाराष्ट्राचेही नाव देशपातळीवर गाजत आहे. आगामी काळात या अकॅडमीतील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील आणि सातार्याचे नाव सातासमुद्रापार गाजवतील, अशी अपेक्षा सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी याप्रसंगी व्यक्त केली.