मेढा ( अभिजीत शिंगटे ) :- सध्या सर्वांचे लक्ष सातारा जावली मतदार संघाकडे लागल्याने या मतदारसंघास ऐतिहासीक महत्व प्राप्त झाले आहे. सातारा जावली राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात कमळ फुलणार कि पुन्हा एकदा घडयाळ्याची टिकटिक वाजणार हे पहाणे योग्य ठरणार आहे.
सातारा जावली विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार दिपक पवार आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातच लढत होत असून यात कोण बाजी मारणार यांची चर्चा जोर धरू लागली आहे. पारावर, चौकाचौकात विषय रंगू लागले आहेत. माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावलीत विकासकामे करीत आपला गट निर्माण केला आहे तर त्याच जावलीत दिपक पवार यांनी ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन निधी आणल्याचे निदर्शनास येत असल्याने बापूंना मानणारा गटही येथे कार्यरत आहे. गेली दहा वर्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपला कामाचा ठसा उमटविला असला तरी दिपक पवार यांनी वेळो वेळी विविध कार्यक्रमांनी आपला जनसहभाग ठेवला आहे. विकासकामे होत नाहीत म्हणून भाजपात प्रवेश करणारे बाबा आणि भाजपात प्रामाणिकपणे काम करुनही दुर्लक्षित केलेले बापू यांच्या या लढतीकडे संपूर्ण जावलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे. सातारा जावली विधानसभेला महायुती विरुद्ध महाआघाडी यांच्यात शाब्दीक युध्द रंगू लागले आहे. प्रत्येक पक्क्षाचे नेते, कार्यकर्ते आपलाच उमेदवार कसा विजयी होईल याची चाचपणी करत असून आपल उमेदवार विजयी व्हावा याकरीता जीवाचे रान करीत आहेत.विजयाचे दोन्ही पक्षातुन दावे करण्यात येत असून दोन्ही पक्षांच्या रॅली, कोपरा सभा, मेळावे यातुन आपणच जिंकणार असा दावा करण्यात येत आहे. मात्र ग्रामीण भागात एकंदरीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल नाराजी व खदखद दिसून येत आहे. गेली चार दशकाहून अधिक काळ १९९५ चा अपवाद वगळता कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत असल्यामुळे भाजपाचे कमळ फुलवताना कार्यकत्यांना कसरत करावी लागणार आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून ज्यांच्याकडे आदराने पाहीले जाते ते शरद पवार साहेब यांचे सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील वर्चस्वाला नाकारता येणार नाही.आज त्याचाच परिणाम म्हणुन तरुण वर्ग , ज्येष्ठ नागरीक , नोकरदार, यांना पवारसाहेबांविषयी वाटणारे प्रेम हि राष्ट्रवादीच्या जमेची बाब आहे. भारतीय जनता पार्टी व जावली तालुका यांचा संबंध राजकारणात अल्प प्रमाणात होता . माजी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टी तालुक्यामध्ये वाढेल हि अटकळ बांधली जात आहे. पण दुसरीकडे मतदारांच्या मानसिकतेमध्ये सुध्दा या निर्णयाविरोधात असणारा नाराजीचा सुर परिवर्तनाच्या दृष्टीने वाटचाल करीत असून राष्ट्रवादी पक्षाला या निवडणुकीत त्याचा फायदा होईल हे नाकारता येणार नाही.जावली विधानसभा मतदारसंघ असताना सलग दोन वेळे पेक्षा कोणालाही हॅट्रीक करता आली नाही मात्र सातारा जावली विधानसभा निर्माण झाले नंतर सलग दोन वेळा आमदार झालेले शिवेंद्रसिंहराजे भोसले हॅट्रीक करणार का ? राष्ट्रवादीचे उमेदवार दिपक पवार बाजी मारणार याचा फैसला मतदानानंतर स्पष्ट होणार असून सातारा जावलीची जागा भाजपा की राष्ट्रवादी जिंकणार याकडे संपूर्ण मतदार संघाचे लक्ष लागले आहे
सातारा जावली मतदारसंघात नक्की काय घडणार…. ? कमळ फुलणार कि घड्याळाची टिकटिक चालू राहणार ….?
RELATED ARTICLES