सातारा- शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणि आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचनेनुसार खिंडवाडी येथील बाजार समितीच्या नवीन जागेवर दर रविवारी जनावरांचा बाजार भरवला जाणार आहे. या आठवडा जनावरे बाजाराचा शुभारंभ येत्या रविवारी दि. ३० रोजी सकाळी १० वाजता आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केला जाणार असल्याची माहिती सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांनी दिली आहे.
कायदेशीर लढाई जिंकून बाजार समितीने खिंडवाडी येथील जागा मिळवली असून या ठिकाणी विकासरत्न अभयसिंहराजे भोसले उपबाजार विकसित करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जागेच्या अभावी गेल्या अनेक वर्षांपासून जनावरे बाजार बंद होता. आता बाजार समितीकडे पुरेशी जागा उपलब्ध झाली असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सोयीसाठी या ठिकाणी दर रविवारी जनावरांचा बाजार भरवण्यात यावा, अशी सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी बाजार समितीला केली होती. त्यानुसार येत्या रविवारपासून खिंडवाडी येथे (कणसे ढाब्या शेजारी, हायवे लगत) बाजार समितीच्या जागेत जनावरे बाजाराचा शुभारंभ केला जाणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
जनावरांचा व्यापार करणाऱ्या लोकांकडून अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. शेतकऱ्यांना उच्च प्रतीची दर्जेदार जनावरे स्वतः पाहून, पसंत करून योग्य किमतीत खरेदी करता यावीत, तसेच इच्छुक शेतकऱ्यांना आपली जनावरे योग्य किमतीत विक्री करता यावीत यासाठी बाजार समितीच्या खिंडवाडी येथील विकासरत्न अभयसिंहराजे भोसले उपबाजार येथे आठवडा जनावरे बाजार सुरु करण्यात येत आहे. या रविवारी याचा शुभारंभ होत असून इच्छुक शेतकऱ्यांनी आपली जनावरे विक्री करण्यासाठी आणावीत तसेच ज्या शेतकऱ्यांना जनावरे खरेदी करावयाची आहेत अशा सर्वांनीच या जनावरे बाजारात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सभापती विक्रम पवार, उपसभापती मधुकर पवार आणि संचालक मंडळाने केले आहे.