दोन्ही ठिकाणी इमारतीचे दोन स्वतंत्र अनधिकृत मजले तोडले
सातारा : अजिंक्य कॉलनी कँप सदरबझार व 186 रविवार पेठ या दोन पेठांमध्ये सातारा पालिकेने शुक्रवारी अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला. दोन्ही ठिकाणी इमारतीचे दोन स्वतंत्र अनधिकृत मजले तोडून काढण्यात आले. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामे करणार्यांना चांगलाच चाप बसला आहे.
या कारवाईत अतिक्रमण निरीक्षक शैलेश अष्टेकर, भाग निरीक्षक सतीश साखरे, श्रीकांत गोडसे, तसेच आठ कर्मचार्यांच्या पथकाने शहरातील दोन मोठया अतिक्रमणांना दणका दिला. अजिंक्य कॉलनी सदर बझार येथे अनिल जाधव यांच्या इमारतीच्या वरच्या मजल्याचे बांधकाम विनापरवाना करण्यात आले होते. हे बांधकाम अक्षरश: हा तोड्याने तोडून काढण्यात आले. तसेच पुन्हा ते बांधकाम न करण्याची तंबी संबधितांना देण्यात आली. 186 रविवार पेठ येथे (आकार हॉटेलची पिछाडी) मोमीन यांच्या मजल्याचे अतिक्रमण होते.
या प्रकरणी मोमीन यांचा शेजारी प्रदीप कांबळे याने नगरपालिकेकडे तक्रार करून आत्मदहनाचा इशारा दिला होता. मोमीन यांनी राजकीय दबावाचा वापर करून ही कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र अतिक्रमण हटाव पथकाने रविवार पेठेत बेधडकपणे कारवाई करून अनधिकृत बांधकामाचा राडारोडा उतरवून टाकला. या दणकेबाज कारवाईनी सातार्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सलग सात दिवस ही अतिक्रमण मोहिम सुरू राहणार असून सातारा शहर अतिक्रमण मुक्त करणार असल्याचा इशारा दिला आहे.
पालिकेचा अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा
RELATED ARTICLES