विरोधी नगरसेवकांना सभागृहात बोलण्यास नगराध्यक्षांचा मज्जाव: विरोधी नगरसेवक आक्रमक
सातारा: पालिका सर्वसाधारण सभेत सभागृहात विरोधी नगरसेवक, नगरसेविका यांना नगराध्यक्ष सौ. माधवी कदम यांनी बोलण्यास मज्जाव केला. यावेळी विरोधी नगरसेवकानी आक्रमक भूमिका घेऊन नगराध्यक्षांना धारेवर धरले. सभागृहात विरोधी नगरसेवक व नगराध्यक्षा यांच्यात शाब्दिक खडाजंगी उडाली. यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी बाळासाहेब खंदारे आपण सभागृहात बोलताना नियम पाळून बोलावे. अन्यथा कारवाई करण्यास भाग पाडू नये, असे सुनावले. यावेळी सातारा शहरात सुरू असलेले भुयारी गटारी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे असा आरोप विरोधी नगर विकास आघाडी व भाजप नगरसेवकांनी केला.
दरम्यान विरोधी नगरविकासचे नगरसेवक बाळासाहेब खंदारे म्हणाले, स्टँडींग कमिटी सभेत विरोधकांचे विषयासह 382 विषय मंजूर केले आहेत. मंजूर विषय पूर्ण करा. निवडणूकीच्या तोंडावर सातारकर नागरिकांना विकास कामाचे गाजर दाखवून फसवणूक करू नका. बनकर साहेब सातारा विकास आघाडी सभागृहाची आणि सातारच्या जनतेची दिशाभूल करणार नाही, याची मला खात्री आहे. पण तुम्ही मंजूर केलेले 382 विषयाची कामे मार्गी लागली नाही तर गाजराचा हलवा केला जाईल, असे खंदारे यांनी सुनावले.
पालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेला वादळी विषयावर सुरवात झाली. भाजप नगरसेवक धनंजय जांभळे म्हणाले शहरातील प्रश्नांवर सभागृहात बोलण्यास अडकाठी करू नये. विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनीही सर्व विरोधकांना बोलू न देणे ही चुकीची प्रथा पाडू नका. यावेळी नगराध्यक्षा म्हणाल्या प्रसिध्दसाठी कोणी बोलू नये. विषयांतर ना करता दोनच मिनिटे बोलावेअसे सांगितले. यानंतर नगरविकास आघाडी नगरसेविका लीना गोरे यांनी भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे, ते निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. अशोक मोने व भाजप नगरसेवक धनंजय जांभळे यांनीही भुयारी गटार योजनेच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून 110 कोटी रुपये आले होते. असा विषय सभागृहात नगर विकास आघाडीचे नगरसेवक अविनाश कदम यांनी आणल्यावर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील 20 विषयांना सभागृहात मंजुरी देण्यात आली. यावेळी सदरबजार शॉपिंग सेंटर येथील रस्ते डांबरीकरण कामासाठी 10 लाख, केसरकर पेठतील जाधव घर रस्ता डांबरीकरण 11 लाख, 42 हजार 710, बसपा पेठ, भोसले नगर तोडकर कॉलनी रस्ता डांबरीकरण 9 लाख 92 हजार 990 तर सोनगाव कचरा डेपो येथे ट्रान्सफॉर्मर, विद्युत पोल व लाईट टाकण्यासाठी 13 लाख 60 हजार रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकाच्या या विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली.
‘भुयारी गटारी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे’
RELATED ARTICLES