Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीसातारा प. समितीत खड्डे व घरकुल यादीमुळे सदस्यांमध्ये धुमश्‍चक्री

सातारा प. समितीत खड्डे व घरकुल यादीमुळे सदस्यांमध्ये धुमश्‍चक्री

सातारा:  सातारा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या सातारा पंचायत समितीच्या मासिक सभेत रस्त्यावरील खड्डे व घरकुल यादीमुळे उपसभापती व सदस्यांमध्ये चांगलीच धुमश्‍चक्री उडाली. जनावरांच्या दवाखान्यातील खोल्यांमध्ये कोण राहते, याची विचारणा केल्यानंतर अधिकार्‍यांनी माहिती दिल्यामुळे या सभागृहात सदस्यच अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.
सभापती मिलिंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपसभापती जितेंद्र सावंत, ज्येष्ठ सदस्य संजय पाटील, आशुतोष चव्हाण, सरिता इंदलकर, राहुल शिंदे, संजय घोरपडे यांच्यासह गटविकास अधिकारी अमिता गावडे व इतर सदस्य उपस्थित होते. प्रारंभी पुरवणी अर्थसंकल्पातील सेस फंडाच्या निधीबाबत सदस्यांना विश्‍वासात घेतले जात नाही, असा आरोप करुन सदस्यांनी पदाधिकार्‍यांना धारेवर धरले. बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्रातील रस्त्यावरील सर्व खड्डे बुजविण्यास सांगितले पण, अद्यापही खड्डे मुजविले गेलेले नाहीत, त्यामुळे खोटे आश्‍वासन देणार्‍या मंत्र्यांविरोधात निषेधाचा ठराव घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी भाजपचे सदस्य संजय घोरपडे आक्रमक झाले. त्यांनी याबाबत सभापतींनी बोलावे, उपसभापतींचे आम्ही ऐकून घ्यायला आलेलो नाही, असे स्पष्ट करुन या ठरावाला विरोध केला. राहुल शिंदे, सरिता इंदलकर, रामदास साळुंखे, संजय पाटील यांनीही आक्रमकरित्या पंचायत समितीच्या कारभारात पारदर्शकता नसल्याचे सूचित केले. यंदाच्या वर्षी सभापतींच्या खेड व उपसभापतींच्या लिंब या गावातच मोठ्या संख्येने घरकुल यादी मंजुर झाल्याचे प्रसारमाध्यमांनी आवाज उठवला. ही बाब सदस्यांनी निदर्शनास आणली. या यादीबाबत उपसभापती सावंत यांना जाब विचारल्यानंतर झालेल्या मंजुरीबाबत त्यांनी सारवासारव करुन जे सदस्य लाभार्थींचे प्रस्ताव देतील, ते मंजूर करण्यात येतील, असे सांगून या वादग्रस्त घरकुल यादीबाबत मौन धारण करण्यात धन्यता मानली.
सातारा पंचायत समितीच्या मासिक सभेत शाहूपुरीत क्रिडा संकुल उभे करावे, तसेच गावातील विकासकामांबाबत सर्वच सदस्य मतदारसंघातील प्रश्‍न मांडतात, पण ते जनतेपर्यंत पोहोचत नाहीत. घरकुलाची यादी जनतेपर्यंत पोहोचल्यामुळेच सदस्य जागृत झाले. त्यामुळे सातारा पंचायत समितीच्या पदाधिकार्‍यांना या सभेत अक्षरश: चार पावले मागे जावूनच कामकाम पहावे लागले. यामध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी दिसून आल्यामुळे नवीन वर्षात पदाधिकारी बदलाचे संकेत मिळू लागले आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular