सातारा : खवैय्यांची तृप्ती करणारी राजवाडा परिसरातील चौपाटी व फळविक्रेते हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. चायनीज विक्रेते फळ गाडा विक्रेत्यांनी सोमवारी पालिकेत येऊन आम्हाला राजवाडा परिसरातून हटवण्यात येऊ नये असे आशयाचे निवेदन दिले.
विक्रेत्यांना भवानी पेठ मंडईचा दुसरा मजला किंवा सदाशिव पेठ भाजी मंडई परिसरातील हॉकर्स झोनचा पर्याय सुचवण्यात आला आहे. मात्र या पर्यायावर विक्रेत्यांनी चुप्पी साधल्याने या वादाचा गुंता वाढला आहे. फेरीवाला समितीची दोनच दिवसा पूर्वी झालेल्या बैठकीत ऐतिहासिक राजवाडा परिसरातील 500 मीटर अंतराच्या आतील फळ गाडे व चायनीज टपर्या हटवण्याचा निर्णय झाला होता. वाहतूक विभागाने सुद्धा या बैठकीत हॉकर्स झोनच्या निश्चितीनंतर राजवाड्यावर अतिक्रमण करणार्यांवर कारवाईचे संकेत दिले होते. येथील शासकीय विश्रामगृहात खासदार उदयनराजे भोसले यांच्या सोबत फळ विक्रेत्यांनी घेतलेल्या बैठकीतही चौपाटी हटवव्याच्या विषयावर चर्चा झाली. ही भूमिका उदयनराजे भोसले यांनी स्पष्टपणे घेतल्याचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सांगितले.
राजवाडा चौपाटी वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे सलग आठ दिवस बंद राहणार आहेत. हॉकर्स समितीत झालेल्या निर्णयामुळे विक्रेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे .विक्रेत्यांनी बैठक घेऊन या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सोमवारी सकाळी पालिकेत धाव घेतली. फळ विक्रेते संघटनेच सर्व प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. सुमारे दहा मागण्यांचे निवेदन यावेळी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना सादर करण्यात आले. मात्र मूळ मागणी की विक्रेत्यांना राजवाड्यावरून हटवण्यात येऊ नये हीच होती.
या विषयावर चर्चा करताना पुन्हा मुख्याधिकारी गोरे यांनी हॉकर्स झोनची आठवण करून दिली. भवानी पेठ येथील श्रीमंत प्रताप सिंह महाराज भाजी मंडई व सदाशिव पेठ येथील जुनी मंडई येथील हॉकर्स झोन चा पर्याय ठेवण्यात आला आहे. मात्र कोणत्याच पर्यायावर चर्चा न झाल्याने काहीच निष्पन्न झाले नाही. दिशा विकास मंचचे अध्यक्ष सुशांत मोरे यांनी दि 26 रोजी चौपाटी राजवाडा येथून न हटल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राजवाडा परिसरातील फळगाडे व चायनीज टपर्या हटवण्याच्या हालचाली सुरू
RELATED ARTICLES