पाटण:- दोन दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे पाटण तालुक्यात शेती, पशुधन, रस्त्यांचे, घरांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी ओढ्यांवरील फरशी पुल, साकव वाहून गेल्याने, रस्ते खचल्याने वाहतूक व दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी सांगितले. ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना ते पत्रकारांशी बोलत होते
सत्यजितसिंह पाटणकर यांनी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पाटण,केरा विभाग व मणदुरे विभागाची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे ओढ्यांचे पाणी शेतात घुसून अनेक शेतकऱ्यांची संपूर्ण पिकेच वाहून गेल्याचे पाहून पाटणकर यांनी हळहळ व्यक्त केली. यावेळी पाटणकर यांनी खिन्न आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना धीर दिला. कांहीही झाले तरी लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करुन नुकसान झालेल्या शेतीचे त्वरीत पंचनामे करावे असे सांगितले. संबंधित अधिका-यानींही उद्यापासून नुकसानीचे पंचनामे सुरू करणार असल्याचे सांगितले.
अतिवृष्टीमुळे अनेक नाले, ओढे तुंबल्याने पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. हे ओढे व नाले त्वरीत साफ करावेत, या नाल्यांमधून, ओढ्यामधून वाहून आलेल्या घाणीमुळे रोगराई पसरणार नाही याचीही दक्षता घ्यावी. त्याचबरोबर ज्या ठिकाणी फरशी पुल, साकव वाहून गेले आहेत अशा ठिकाणी तात्पुरती पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी जेणेकरून पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटू नये. त्याचबरोबर येथे कायमस्वरूपी चांगले भक्कम पुल , साकव निर्माण करण्यासाठी निधीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सत्यजितसिंह पाटणकर यांच्या सोबत पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार,तहसीलदार योगेश्वर टोम्पे, नगरपंचायत मुख्याधिकारी अभिषेक परदेशी पाटण नगरपंचायतचे नगराध्यक्ष अजय कवडे, उपनगराध्यक्ष विजय टोळे, नगरसेवक,विभागातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.