Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीजिवंत व्यक्ती मयत दाखवून धान्याचा अपहार ; एकावडेवाडीच्या स्वस्त धान्य दुकानदारासह जिल्हा...

जिवंत व्यक्ती मयत दाखवून धान्याचा अपहार ; एकावडेवाडीच्या स्वस्त धान्य दुकानदारासह जिल्हा पुरवठा अधिकारी, तालुका पुरवठा निरीक्षकास निलंबित करावे : भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. कविता कचरे यांची मागणी

साताराः पाटण तालुक्यातील एकावडेवाडी (सळवे) येथील स्वस्त धान्य दुकानदार सुरेखा तानाजी यादव यांनी ग्राहक रजिस्टर तसेच कौटूंबिक शिधापुरवठा पत्रिकेवर शालन संपत कदम रा. एकावडेवाडी (सळवे) ही महिला जिवंत असताना मयत दाखवून तसेच अनेक महिला अविवाहित असताना विवाहित दाखवून 104 कुटूंबाच्या नावावरील धान्याचा गैरवापर केला आहे. याला दोषी ठरलेल्या तालुका पुरवठा अधिकारी श्री. ठोंबरे, तत्कालीन तहसिलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी वसूंधरा बारवे यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. कविता कचरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.
पुढे बोलताना सौ. कविता कचरे म्हणाल्या, एकावडेवाडी ता. पाटण येथील स्वस्त धान्य दुकानदार सुरेखा तानाजी यादव यांनी सळवे येथील सुरेश आनंदा कदम त्यांच्या दुकानाला जोडावे म्हणून ग्रामपंचायत सळवे यांच्यावतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेत ठराव घेण्यात आला होता मात्र दुकान हस्तांतरण करण्यात आलेले नाही.उलट महिला स्वस्त धान्य दुकानदार सुरेखा यादव यांनी त्यांच्याकडे नोंद केलेल्या रजिस्टरमध्ये व कौटूंबिक शिधापुरवठा पत्रिकेमध्ये खाडाखोड करून सळवे येथील शालन संपत कदम ही महिला जिवंत असताना मयत दाखवून काळाबाजार केला आहे. याशिवाय गावामधील अविवाहित महिला मुलींना विवाहित दाखवून धान्याचा कोटा उचलून त्यामध्यें मोठया प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी म्हणून जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री ना. गिरीष बापट यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले होते. जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी थातुरमातूर माहिती देवून अहवाल तयार केला आहे तसेच शासनाची फसवणूक केली आहे. ना. गिरीष बापट यांनी दिलेला आदेश बासनात ठेवून वरकरणी तपास करून महसूल अधिकार्‍यांनी दोषींना अभय दिले आहे. याबाबत तातडीने दोषी असणार्‍या जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, पाटण तालुका पुरवठा अधिकारी ठोंबरे यांना भ्रष्टाचारास खतपाणी घातल्याप्रकरणी धान्य व रॉकेलच्या घोटाळयास मदत केल्याप्रकरणी दोषी ठरवून निलंबित करावे तसेच एकावडेवाडी ता. पाटण येथील स्वस्त धान्य दुकानदार सुरेखा तानाजी यादव यांचा दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सौ. कविता कचरे यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेला भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा संगीताताई भोसले, सातारा तालुका अध्यक्षा स्वाती शेडगे, नगरसेविका सिध्दी पवार, नगरसेवक विजय काटवटे उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular