सातारा : सेव्हन स्टार मल्टीप्लेक्स या पाच स्क्रिन बहुविध चित्रपटगड चव्हाण बंधूंनी उभारून शून्यातून विश्व निर्माण केले आहे. या इमारतीमुळे सातारच्या वैभवात भर पडेल, असे प्रतिपादन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
सातारा बसस्थानकात परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या सेव्हन स्टार मल्टीप्लेक्स पाच स्क्रिन बहुविध चित्रपटगृहाचे फित कापून व स्क्रिनचा शुभारंभ खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सातारा पालिकेच्या नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, सौ. सुनिता चव्हाण, रविंद्र चव्हाण, सौ. माधवी चव्हाण, महेंद्र चव्हाण, नरेंद्र पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, डॉ. संजीव कदम, राम हादगे, दै. ग्रामोध्दारचे संपादक बापूसाहेब जाधव, युवराज पवार, जि. प. चे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे, माजी शिक्षण सभापती सुनिल काटकर, वाई अर्बन बँकेचे काळेसाहेब, उद्योगपती कपूरसाहेब, अॅड. अंकुश जाधव, साविआचे नगरसेवक यांनी विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले, खर्या अर्थाने आज माझ्या डोळ्याचे पारणे फिटले, आपण लहानपणी फायूस्टार चॉकलेट खात होतो. मला सेव्हन स्टार काय आहे माहित नव्हते, पण येथे आल्यानंतर सेव्हन स्टार समजले. या सेव्हनस्टारचे उद्घाटन करताना मला मनस्वी आनंद झाला. असेच सर्वांनी माझ्यावर भरभरुन प्रेम ठेवावे, या इमारतीमध्ये गुटखा, तंबाखू खावून अस्वच्छ करु नये. नेहमी स्वच्छता ठेवावी, येथे धुम्रपान करु नका? नाही तर माझ्याशी गाठ आहे, असा इशारा देवून चव्हाण बंधूंच्या या उपक्रमास मनापासून शुभेच्छा दिल्या.
आपल्या प्रास्ताविक भाषणात विकासक अरविंद चव्हाण म्हणाले, आम्ही सहा भाऊ, एक भाऊ सैन्य दलात, तर पाच भाऊ येथे शिकलो, रविंद्र चव्हाण आर्किटेक्ट झाले. चव्हाण बंधूंनी सातार्यात नवीन इमारती उभ्या केल्या. यामध्ये रयत शिक्षण संस्था, मार्केट यार्ड, एस. टी. बसस्थानक, महाराजा हॉटेल आणि आता सातवी इमारत म्हणून सेव्हन स्टार मल्टीप्लेक्सचा समावेश आहे. याचा आम्हाला गर्व वाटतो. या इमारतीच्या डिझाईनला पहिले बक्षिस मिळाले होते असे त्यांनी आवर्जुन स्पष्ट केले.
प्रारंभी यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आर. सी. सी. डिझायनर विजय देवी, चंदन मिरजकर, रवींद्र चव्हाण, महेंद्र चव्हाण यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. रंगकर्मी तुषार भद्रे यांनी सूत्रसंचालन केले तर अॅड. विकास पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेव्हन स्टार मल्टीप्लेक्समुळे सातारच्या वैभवात भर पडेल : श्री. छ. खा. उदयनराजे भोसले
RELATED ARTICLES