कोरेगाव : राज्य शासनाच्या 72 लाख रुपयांच्या निधीतून सुरु असलेल्या शांतीनगर येथील भुयारी गटार योजनेच्या कामास दिवसेंदिवस राजकीय रंग चढू लागला आहे. राजकीय पक्षांची एंट्री या योजनेच्या आंदोलनामध्ये झालेली असून, योजनेच्या विरोधात आणि समर्थनार्थ दोन उपोषणे देखील झाली. उपोषणावर पडदा पडतो तोच आता परिसरातील संतप्त महिलांनी महसूल प्रशासनाला मंगळवारी निवेदन देत योजनेचे थेट फेरसर्वेक्षण करण्याचीच मागणी केली आहे.
शांतीनगर भुयारी गटार योजनेच्या कामाने राजकीय स्वरुप घेतले असून, हे काम सुरु होऊ न देण्याच्या उद्देशाने एकत्रित आलेल्या नागरिकांनी तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले होते. योजनेच्या कामाची सविस्तर आणि निष्पक्ष चौकशीची मागणी करत साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यावर चर्चेद्वारे मार्ग काढण्यासाठी तहसीलदार सौ. रोहिणी शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरील हा चौकशीचा विषय असल्याने व प्रांताधिकारी सौ. कीर्ती नलावडे यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त चौकशी समितीचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकार्यांपर्यंत सादर होईपर्यंत कोणत्याही स्वरुपाचे आंदोलन न करण्याची विनंती केली होती. ती विनंती मान्य करत रहिवाश्यांनी उपोषण मागे घेतले होते.
निव्वळ राजकीय उद्देशातूनच योजनेचे काम बंद पाडण्यात आले असून, योजनेची आवश्यकता पटवून देण्यासाठी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्यासह नगरसेवक बाळासाहेब बाचल, महेश बर्गे, सौ. शुभांगी राहूल बर्गे, सौ. साक्षी सुनील बर्गे, सौ. पूनम अमोल मेरुकर, राहूल रघुनाथ बर्गे, सुनीलदादा बर्गे, भाजयुमोचे शहराध्यक्ष श्रीकांत बर्गे यांच्यासह परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व रहिवाश्यांनी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करत प्रशासनाला अल्टीमेटम दिला होता. भाजपचे युवानेते महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशोर बाचल यांनी उपोषणामध्ये सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दिला होता. महेश शिंदे यांनी नागरिकांशी सुसंवाद साधत योजनेचे महत्व पटवून दिले होते, मात्र परिसरातील आक्रमक झालेल्या महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. मंगळवारी परिसरातील महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी तहसीलदार सौ. रोहिणी शिंदे, प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार अमर रसाळ यांची भेट घेऊन भुयारी गटार योजनेचे काम सुरु न करण्याची मागणी केली. त्यांनी प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनामध्ये नगरपंचायतीविषयी एकूण 17 मुद्दे उपस्थित केले आहेत. प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावास बळी न पडता योजनेचे फेर सर्वेक्षण करावे आणि योजनेचे सांडपाणी गावंधर भागाच्या पुर्वेला न सोडता पर्यायी मार्गाने ते काढण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
शांतीनगर भुयारी गटार योजनेचे फेरसर्वेक्षण करा, संतप्त महिलांची महसूल प्रशासनाकडे मागणी
RELATED ARTICLES

