पाटण:- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४८ वा शिवराज्याभिषेक दिन पाटण शहरासह तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ६ जून रविवारी सकाळी ९ वा. पाटण पंचायत समितीच्या आवारात भगव्या ध्वजाची गुढी उभारुन राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतांने या ध्वजाला वंदन करण्यात आले. यासह नगरपंचायत पाटण, श्रीमंत नागोजीराव पाटणकर वाचनालय पाटण, झेंडा चौक पाटण सुंदरगड (दात्तेगड) तसेच पाटण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालय येथे छत्रपती शिवप्रतिमेचे पुजन व भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
पाटण पंचायत समिती येथे शिवराज्याभिषेक दिनी सभापती राजाभाऊ शेलार, गटविकास अधिकारी सौ. मिना साळुंखे यांच्या हस्ते भगवा ध्वज गुढी उभारुन पुजन करण्यात आले. यावेळी या भगव्या ध्वजाला राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतांने वंदन करण्यात आले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभुते तसेच सर्व पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते.
पाटण नगरपंचायतच्या प्रांगणात नगराध्यक्ष अजय कवडे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष विजय टोळे, नगरसेवक संजय चव्हाण,किरण पवार, सचिन देसाई, उमेश टोळे, शशिकांत देवकांत, बाळासो महाजन, संभाजी भिसे आदी कर्मचारी हजर होते.
पाटण येथील श्रीमंत नागोजीराव पाटणकर वाचनालय (लायब्ररी चौक) येथे जेष्ट नागरिक यशवंतराव जगताप, शरद राऊत यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तर वाचनालयाचे अध्यक्ष चंद्रहार निकम, सुरेश पाटील, शंकरराव कुंभार यांच्या हस्ते छत्रपती शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी शिवप्रेमी मनोहर यादव, संजय इंगवले यांनी छत्रपती शिवकार्याबध्दल आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महादेवराव खैरमोडे, चंद्रकांत मोरे, नितीन पिसाळ, बाळासाहेब पवार, दत्तात्रय कवडे, शंकर मोहिते, विक्रांत कांबळे, शिवाजीराव कोळेकर, लक्ष्मण चव्हाण, अनिल बोधे, गणेश मोरे, राजेंद्र राऊत, राजेंद्र पाटणकर, सुशांत शिंदे, जोतिराम जाधव, यांची उपस्थिती होती.
सुंदरगड (दात्तेगड) येथे सुंदरगड संवर्धन समितीच्या मावळ्यांनी ३४८ वा छत्रपती शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी गड पुजन, देवदैवतांचे पुजन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन गडावर भगवा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी शिवघोषांनी गड दुमदुमून गेला. तसेच पाटण येथील झेंडा चौक व पाटण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.