सातारा : बामणोली ते वासोटा या दरम्यानच्या शिवसागर तलावातील बोटिंगची परवानगी नाकारण्यात आली आहे . बोट क्लबचे नियमन व पर्यावरणाच्या मानकांप्रमाणे उपलब्ध सुविधांच्या मुद्यांवर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संचालिका विनिता व्यास यांनी बोट ठेवले त्यामुळे शुक्रवारी वनविभागाच्या सातारा येथील सेमिनार हॉलमध्ये बोट कलब चालकांच्या शिष्टमंडळाचा वनविभागाच्या प्रशासनाशी मोठा वाद झाला,मात्र चर्चेत कोणताच तोडगा निघाला नाही .
वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला वनविभागाचा तपासणी नाका हलवण्यात आला असून गेल्या दोन दिवसापासून या केंद्राचे कामकाज सुरू झाले आहे . मात्र बामणोली ते वासोटा या दरम्यानच्या बोटिंगला सहयाद्री व्याघ्र प्रकल्प व जलसंपदा विभाग यांची राष्ट्रीय हरीत लवादाच्या सूचनेनुसार हरकत आल्याने गेल्या आठ दिवसापासून शिवसागर जलाशयातील बोटिंग बंद आहे . ऐन पर्यटनाच्या हंगामात बोटिंग बंद झाल्याने रोजगाराचे नुकसान होत असल्याने बोट क्लबचालकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन शुक्रवारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संचालिका विनिता व्यास यांची सातार्यात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली . यावेळी उपवनसंरक्षक भीमसिंह हाडा, मेढा परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल आर . एस . परदेशी या वेळी उपस्थित होते .
बोट क्लबच्या सदस्यांनी व्यास मॅडम यांना जलाशयात बोटिंग करण्याची परवानगी मिळावी असा आग्रह धरला . बोटिंग बंद असल्याने आमचे आर्थिक नुकसान होत असल्याचे गार्हाणे यावेळी मांडण्यात आले . मात्र बोट कलबच्या नियमनाचा मुद्दा व्यास यांनी उपस्थित केल्यावर चर्चेच्या मूळ मुद्याची कोंडी झाली . नादुरूस्त बोटी, अप्रशिक्षित बोटचालक, लाईफ जॅकेटचा अभाव, बोटींच्या इंधनाचे होणार्या जलप्रदूषणाचा प्रलंबित तपासणी अहवाल या मुद्दयांवर वनविभागाकडून विचारणा झाल्यावर बैठकीतच खडाजंगी सुरु झाली . जर परवानगी मिळाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला . सुमारे पाऊण तास चाललेल्या या बैठकीत विनिता व्यास यांचे म्हणणे ऐकण्याच्या मनःस्थितीत कोणीच नव्हते . प्रशासन ताठर भूमिका घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला . काहींनी बैठकीत संतापाच्या भरात पुन्हा आंदोलन करू असा इशारा दिला . बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्याने अखेर चर्चा फिसकटली .
शिवसागर तलावातील बोटिंगला पुन्हा नकार
RELATED ARTICLES