Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीदिमाखात लोकार्पण केलेली शिवसेनेची रुग्णवाहिका धूळ खात पडून

दिमाखात लोकार्पण केलेली शिवसेनेची रुग्णवाहिका धूळ खात पडून

सातारा : एखाद्या राजकीय नेत्याच्या कार्याचा गौरव म्हणून सामाजिक जाणीव ठेवून अनेक वास्तू उभ्या राहिलेल्या आहेत. तशाच पद्धतीने लोकांच्या उपयोगी पडणार्‍या वस्तू लोकार्पण करुन त्याचा फायदा समाजाला व्हावा, यासाठीही प्रयत्न केला जातो. परंतू सातार्‍यात शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकार्पण करण्यात आलेली रुग्णवाहिका सध्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकाच्या पाठीमागील इमारतीत धूळ खात पडून आहे, याकडे कोणाचेच लक्ष नसल्यामुळे परिसरातील भंगार चोर त्यावर नजर ठेवून असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत माहिती अशी की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानतर्फे तत्कालीन शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आ. एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यासाठी मारुती ओमनी रुग्णवाहिका दिली होती. त्याचा लोकार्पण सोहळा मान्यवर शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत दि. 27 जुलै रोजी झाला होता. काही दिवस रुग्णांची सेवा केल्यानंतर ही रुग्णवाहिका दिसेनाशी झाली होती. काहीजण ती महाबळेश्‍वरला आहे, काहीजणांना वाटत होते की, ती सांगलीला पाठविण्यात आलेली आहे. परंतू प्रत्यक्षात शोध घेतला असता ही रुग्णवाहिका सातारा-कोरेगाव रस्त्यावरील गुरुशिल्प टॉवर्स, बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथील इमारतीच्या पाठिमागील कोपर्‍यात धूळ खात पडून असल्याचे दिसून आले आहे. सातारा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांच्या अलिशान गाड्या या रस्त्यावरुन नेहमीच जातात. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावरच एका युवा शिवसैनिकाचे कार्यालय आहे. त्यांनासुद्धा या रुग्णवाहिकेचा विसर पडला आहे. तर दुसर्‍या बाजूला महाराष्ट्र शासनाचीही एक रुग्णवाहिका जिल्हा परिषदेच्या पाठिमागे धुळीने माखलेल्या अवस्थेत आहे. गेली अनेक दिवस ती याचठिकाणी विसावली आहे. त्यामुळे या दोन्ही रुग्णवाहिकांचा फायदा रुग्णांना होत नाही, हे स्पष्ट झाले आहे. सामाजिक कार्याची जाणीव असलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी या लोकार्पण केलेल्या रुग्णवाहिकेची दुरुस्ती करुन ती पुन्हा सेवेत आणावी, अशी मागणी गरीब रुग्णांचे नातेवाईक करु लागले आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या रुग्णवाहिकेबाबत माहिती घेवून ती पुन्हा सेवेत आणण्यासाठी वरिष्ठ नेत्यांशी बोलून ती लवकरच कार्यान्वित केली जाईल, अशी माहिती शिवसेना शहरप्रमुख निमिष शहा, विभाग प्रमुख रमेश बोराटे यांनी दिली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular