पाटण :- शिवसेना हा बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष असून पक्षाच्या ध्येयधोरणानुसार आम्ही काम करत राहणार आहे. शिवसेना वाढीसाठी पाटण तालुक्यात गाव तेथे शिवसेना शाखा व घर तेथे शिवसैनिक निर्माण करणार आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यापर्यंत पोहोचविणार आहे. तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना विश्वासात घेवून एकत्रितपणे तालुक्यात शिवसेना वाढविणार असल्याची माहिती पाटण तालुका शिवसेना प्रमुख सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
पाटण तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये उपजिल्हा प्रमुखपदी रविंद्र पाटील, शिवसेनेच्या पाटण तालुकाध्यक्षपदी सुरेश नाना पाटील यांची निवड झाल्यानंतर पाटण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा प्रमुख रविंद्र पाटील, पाटण शहर प्रमुख शंकरराव कुंभार, उपशहरप्रमुख महादेव खैरमोडे, राजेंद्र पाटणकर, विजय कुंभार आदी शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे, ना. विजय शिवतारे, गजानन किर्तीकर, जिल्हा प्रमुख हर्षल कदम यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला तालुकाध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे सुरेश पाटील यांनी आभार मानले.
सुरेश पाटील पुढे म्हणाले, 1995 साली बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून कृष्णा खोरेच्या माध्यामातून कामे सुरू झाली. या माध्यमातून तालुक्यात अर्धवट राहिलेल्या मोरणा-गुरेघर, निवकणे त्याचबरोबरच साखरी-चिटेघर, बिबी लघुपाटबंधारे प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. शिवसेना आणि शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना पाटण तालुक्यातील सर्वसामान्य तळागाळातील जनतेपर्यंत जावून पोहोचविणार आहे. तसेच पाटण तालुका हा पर्यटनाचा तालुका व्हावा आणि येथील पर्यटनाला चालना मिळावी, तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाच्या माध्यमातून चांगले प्रयत्न करणार आहे.
पाटण तालुक्यात शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी पक्षाच्या माध्यमातून तालुक्यात चांगली विकासकामे केली आहेत. तालुक्यासाठी त्यांचे भरीव योगदान आहे. ज्या गावात जाण्यासाठी रस्ता नाही अशा गावांना रस्ता देण्याचे काम करणार आहे. शिवसेना हा बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष असून पक्षाच्या ध्येयधोरणानुसार आम्ही काम करत राहणार आहे. व्याघ्र प्रकल्पांतर्गत समाविष्ट गावांना योग्य न्याय मिळवून देवू. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी शिवसेना नेहमी प्रयत्नशील असून तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न करेल. सध्या कराड-चिपळूण राज्य मार्गाच्या रूंदीकरणाचे काम वेगने सुरू आहे. यात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असून त्यांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने शिवसेना उभी राहिल. तालुक्यातील खेडोपाड्यातील जनता शासकीय कामानिमित्त पाटण येथे ये-जा करत असते. मात्र शासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जनतेला ताकटळत बसावे लागते. हे टाळण्यासाठी शिवसेना आग्रही भूमिका घेणार आहे. ग्र्रामीण भागातील गोरगरीब, गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य साहित्य वाटप करणार असून आम्ही शिवसैनिक थोडेच दिसू मात्र चांगले काम करणार आहे. अन्याय होईल तेथे शिवसेना स्टाईलने लढा देवू. मला मिळालेल्या संधीचे सोने करून तालुक्यात गाव तेथे शिवसेनेची शाखा आणि घर तेथे शिवसैनिक या धोरणानुसार तालुक्यातील गावागावात वाडीवस्तीवर शिवसैनिकांची नोंदणी करणार आहे. तालुक्यात आता शिवसेनेच्या 106 शाखा असून त्या 320 पर्यंत नेणार असल्याचा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
तालुका शिवसेना कार्यकारिणीत आ. देसाई समर्थकांना डावलल्याने जयवंतराव शेलार यांनी विधानसभा क्षेत्र संघटन पदाचा राजीनामा दिल्याचे पत्रकारांनी विचारले असता जयवंतराव शेलार यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. त्यांच्या नाराजीची बातमी खोटी आहे. जर काही लोकांना असे वाटत असेल तर आम्ही त्यांचंी नाराजी दूर करू, असे रविंद्र पाटील व सुरेश पाटील यांनी बोलताना सांगितले.