महाबळेश्वर, दि.18: महाबळेश्वर शहर तालुक्याला भेडसावणारा पश्चिम घाट, इको सेन्सिटिव्ह झोन, हरित लवाद हे प्रश्न सोडवुन महाबळेश्वरच्या पर्यटन, इको टुरिझम वाढीसाठी प्रयत्न करणार आहे .स्ट्रॉबेरी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा आपला मानस आहे, असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले. महाबळेश्वर येथे सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मदनदादा भोसले यांच्या प्रचारार्थ शक्तीप्रदर्शन करत पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर पूनम चौकात आयोजित जाहीर कोपरा सभेत सभेत ते बोलत होते.यावेळी मदनदादा भोसले, माजी नगराध्यक्ष डी.एम. बावळेकर, किसनराव शिंदे ,विकासआण्णा शिंदे, विजय भिलारे,माजी उपनगराध्यक्ष अप्पासाहेब साळुंखे, नगरसेवक रवींद्र कुंभारे,विमलताई ओंबळे, संजय पिसाळ, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख विजय नायडू, लीलाताई शिंदे, राहुल पिसाळ, गोपाळभाऊ वाघदरे,माजी नगरसेवक संतोष शिंदे, सादिकभाई शेख आदी उपस्थित होते.
उदयनराजे पुढे म्हणाले, महाबळेश्वर शहर आणि तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी नेहमी प्रयत्न केला आहे .आगामी काळातही मी यामध्ये कमी पडणार नाही.शहर व तालुक्यासाठी महत्त्वाचा असणारा पश्चिम घाट, इको सेन्सिटिव्ह झोन, हरित लवाद आदि प्रश्न सर्वांशी विचारविनिमय करून मदन भोसले आणि मी मार्गी लावू. महाबळेश्वर येथे जगाच्या कानाकोपर्यातून पर्यटक येत असतात. त्यादृष्टीने हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पर्यटन पर्यटनस्थळ होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे.त्याचप्रमाणे या परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते ,त्यामुळे स्ट्रॉबेरी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा आमचा मानस आहे. या परिसरात कोल्ड स्टोरेज सुविधा उपलब्ध झाली तर शेतकऱ्यांच्या मालाला आणखी भाव मिळून त्यांची आर्थिक प्रगती उंचावेल हे गृहीत धरून आगामी काळात त्या दृष्टीने पावले उचलली जातील. महाबळेश्वर मधील आजच्या पदयात्रेची उपस्थिती पाहून निकाल काय लागेल हे सांगायची गरज नाही. मला आपला पुन्हा आशीर्वाद पाहिजे .मतापेक्षा तुमचे वैचारिक मत, विचार आमच्यासाठी लाख मोलाचे आहेत,असेही उदयनराजे म्हणाले.
मदन भोसले म्हणाले, महाबळेश्वर तालुक्यातील अनेक प्रश्नांची मला जाण आहे. आतापर्यंत विद्यमान लोकप्रतिनिधींनी या प्रश्नासाठी जनतेला झुलवत ठेवण्याचे काम केले मात्र आता एकदा आम्हाला संधी द्या आम्ही तुम्हाला तक्रारीला वाव देणार नाही. महाबळेश्वर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पर्यटनस्थळ होण्यासाठी उदयनराजे भोसले आणि मी प्रयत्न करू. त्याचप्रमाणे तालुक्याचे जे प्रलंबित विषय आहेत ते विषय निवडणुकीनंतर सर्वपक्षीय बैठक घेऊन मार्गी लावले जातील, असेही मदन भोसले म्हणाले. डी. एम.बावळेकर म्हणाले, महाराज साहेब महाबळेश्वर शहर आणि तालुक्याच्या स्थानिक प्रश्नांची आपणास जाण आहे. अनेक प्रश्न आपण मार्गी लावले आहेत. पर्यटन वाढ होण्यासाठी या ठिकाणी भरपूर वाव आहे. त्याचप्रमाणे शहरासह परिसरातील रस्ते चांगल्या दर्जाचे होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तालुक्यात शिवसेना भक्कम असून तालुक्यातून मोठे मताधिक्य दिले जाईल. नगरसेवक रवींद्र कुंभारदरे म्हणाले, उदयनराजे भोसले आणि मदन भोसले यांचा विजय निश्चित असला तरी कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. प्रत्येक गावात, शहराच्या प्रत्येक भागात जाऊन भाजप, शिवसेना महायुतीचा जाहीरनामा लोकांना सांगितला पाहिजे .यावेळी उपस्थितांनी उदयनराजे भोसले आणि मदन भोसले यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली.
महाबळेश्वरात रेकॉर्डब्रेक पदयात्रा…
सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजप शिवसेना व महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे उमेदवार मदनदादा भोसले यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सकाळी महाबळेश्वर शहरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या पदयात्रेत भाजप-शिवसेना, रिपाई यांच्यासह मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.ठिकठिकाणी उदयनराजे भोसले व मदन भोसले यांचे उत्साही स्वागत करण्यात येत होते. यावेळी महाबळेश्वरमधील रिक्षा युनियनच्या वतीने महायुतीला पाठिंबा जाहीर करण्यात आला.