रायरेश्वर : आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांनी स्थापन केलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित धारातीर्थ मोहिमेचा उद्या सकाळी जांभळी (ता. वाई) येथे समारोप होत आहे. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, संभाजीराव भिडे गुरुजी यांचे मोहिमेच्या समारोपाचे भाषण हे मुख्य आकर्षण ठरणार आहे. आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रत्येक वर्षी धारातीर्थ यात्रा अर्थात गडकोट मोहिमांचे आयोजन करते. यावर्षी प्रतापगड ते रायरेश्वर अशी मोहीम आयोजित करण्यात आली होती,
शुक्रवार, 26 जानेवारी रोजी दुपारी प्रतापगडावरील आई भवानी देवीच्या आरतीने या वर्षीच्या मोहिमेचा प्रारंभ झाला. सर्वात पुढे टेहेळणी पथक, त्यानंतर भगवा घेतलेला मानकरी, त्यांच्या बरोबर शस्त्रपथक, आणि मागे स्फूर्ती गीते, महाराजांचा जयघोष करत जाणारे हजारो धारकरी असे मोहिमेचे स्वरूप होते.
या मोहिमेसाठी राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातून धारकरी सहभागी झाले आहेत. या मोहिमेचा पहिला मुक्काम प्रतापगडाचा पायथा येथे असणार्या पार या गावात झाला. यावेळी रात्री ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंगराव बलकवडे यांचे स्फूर्तीदायी व्याख्यान झाले. त्यानंतर धारकरी आपल्या बरोबर आणलेली शिदोरी खाऊन पार येथे मुक्कामी राहिले.
दुसर्या दिवशी भल्या पहाटे मोहिमेची सुरुवात झाली, भिडेगुरुजींच्या बरोबर सूर्य नमस्कार, जोर बैठका हा व्यायाम झाल्यानंतर महाबळेश्वरचा उभ्या चढणीचा डोंगर चढायला मोहीम सरसावली, हजारो-लाखो धारकरी जावळीच्या या खोर्यात मागे अशाच मोहीम रुपात एकत्र आलेले आहेत. या भागातील ही पाचवी सहावी मोहीम आहे. शिस्तबद्ध तरुण डोंगर चढून क्षेत्र महाबळेश्वर येथे मुक्कामी पोहोंचले, येथे इतिहासकार व प्रवचनकार सु. ग. शेवडे यांचे व्याख्यान झाले. रविवारचा मुक्काम कृष्णा काठी बलकवडे या गावात झाला. सोमवारी कमळगड मार्गे मोहीम श्री रायरेश्वर येथे पोहोचणार आहे. मोहिमेचा भंडारा वाटेत वासोळे येथे होणार आहे. या वर्षीच्या समारोपाच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गुरुजी के दर्शन को आये
या मोहिमेत इयत्ता तिसरी पासून 85 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत अनेक धारकरी येतात. महाबळेश्वरच्या थंडीत देशप्रेमाची उब मिळाली आणि थंडी पळून गेली असे मत अनेकांनी व्यक्त केले. तर भिडे गुरुजींच कार्य आणि नाव प्रसारमाध्यमातून संपूर्ण भारतात पोहोचले असल्याने त्यांना पाहण्यासाठी व त्यांचे दर्शन घ्यायला दिल्लीचे दोन तरुण मोहिमेत सहभागी झाले आहेत. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात या राज्यातूनही हजारो तरुण मोहिमेत सहभागी झाले आहेत.
प्रत्येक धारकर्याची एकच इच्छा
32 मण सुवर्ण सिंहासन संकल्प श्री शिवप्रतिष्ठानने रायगड येथे मागील वर्षी केला, त्यानंतर जेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वराच्या आशिर्वादाला उभ्या हिंदुस्थानातून धारकरी आले आहेत. असे गुरुजी म्हणाले, आधी कळस मग पाया अशी आपल्यात म्हण आहे. रायगडावर संकल्प केलेले सिंहासन पूर्ण होण्यास रायरेश्वराचा आशिर्वाद मिळावा, स्वराज्याचे सिंहासन पुनरपी रायगडावर स्थापन व्हावे, हिच यावर्षीच्या मोहिमेतील प्रत्येक धारकर्याच्या मनातील इच्छा आहे आणि त्यासाठीच लाखो धारकरी रायरेश्वरला आले आहेत.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
सातारा जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मोहिमेत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला गेला. विशेष म्हणजे कडाक्याच्या थंडीत पोलीस प्रशासनाने आपले कर्तव्य चोख बजावले. सिस्काचे वैशिष्ठ्यपूर्ण पेट्रो मॅक्स दिवे रात्रीच्या अंधारात धारकरी मंडळींना उपयोगी पडले. स्वयं शिस्तीत सुरु असणारी ही मोहीम पोलीस प्रशासनाला देखील अचंबित करून टाकणारी आहे, असे मत अनेक अधिकार्यांनी व्यक्त केले.