वडूज: खटाव-माण तालुक्यात पाणी फौंडेशनच्या माध्यमातून अनेक गावात वॉटरकपचे वारे जोरात वाहिले होते. दोन्ही तालुक्यातील सुमारे शंभरच्या आसपास गावांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. यापैकी काही गावांचा उत्साह शेवटपर्यंत टिकून राहिला. या माध्यमातून गावोगावी लाखो रुपयांची जलसंधारणाची कामे झाली. अश्यापैकीच खटाव तालुक्यातील डिस्कळ हे गांव आहे. या गावात दुष्काळी परस्थितीत रोजगार हमी योजनेतून एक पाझर तलावाचे काम मंजूर झाले होते. या तलावाचे खोलीकरणही झाले होते. मात्र घळ भरणी व इतर कामासाठी अंदाजे 42 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्यामुळे रोजगार हमीतून हे काम पुर्ण होवू शकले नव्हते. हे रखडलेले काम चालू वर्षी पुर्ण झाले. गावातील एक माजी सैनिक व एक कंपनी मॅनेजर पुढे आल्यामुळे हे काम पुर्णत्वास गेले आहे. ग्रामस्थांच्या एकजूटीला दातृत्वाचे बळ मिळाल्याने लाखो रुपयांचा बंधारा साकारला गेल्याने संबंधितांच्या दातृत्वाचे परिसरात चांगलेच कौतुक होत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, यावर्षी डिस्कळ गावाने वॉटरकप स्पर्धेत सक्रीय सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळात छोट्या-मोठ्या ओढे नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, बांध बंदिस्ती अश्या प्रकारची छोटी-मोठी कामे करण्यात आली. त्यानंतर लोकांचे लक्ष गावासाठी एकमेव असणार्या ससाटी नावाच्या शिवारातील रखडलेल्या पाझर तलावाच्या कामाकडे गेले. 2002 ते 04 या कालावधीत भिषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी सदरच्या तलावाचे काम रोजगार हमी योजनेतून मंजूर झाले होते. यापैकी खोलीकरणाचे कामही बर्यापैकी झाले होते. उर्वरित घळ भरणी व इतर कामासाठी अंदाजे 42 लाखांचा खर्च अपेक्षित होता. मात्र एवढी मोठी रक्कम रोजगार हमी योजनेतून मिळू शकत नव्हती. त्यामुळे हे काम गेली काही वर्षे रखडले होते. यावर्षी या कामाची चर्चा झाली. त्यामध्ये नाममात्र खर्चावर गावातील दोन मशनरी देणार का याची चाचपणी झाली. ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच दत्ता गोडसे, अविनाश कर्णे, नलवडे आबा या कार्यकत्यांनी गावातील माजी सैनिक व उद्योजक सुरेशदादा गोडसे यांच्याकडे पोकलॅन्डची मागणी केली. त्यांनी गावाच्या व्यापक कल्याणासाठी पोकलॅन्ड मशीनसह ब्रेकर, रोलर, व्हायब्रेटर, चार मोठे हायवा डंपर एकही पैसा न घेता गावास दिले. ही सर्व त्यांची मशनरी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शनी-शिंगणापूर, सोनई, राहुरी, या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर कार्यरत होती. त्यांनी स्वखर्चाने मशनरी गावासाठी आणली. व केवळ एक महिन्यात घळ भरणीचे काम पुर्ण करुन दाखविले.
डिस्कळ येथे श्रमदानातून साकार झाला चाळीस लाखाचा पाझर तलाव
RELATED ARTICLES