पाटण:- एप्रिल मे महिन्यातील ऊनाचा तडाखा म्हणजे आगच.पाटण तालुक्यात तर हा ऊनाचा भडका जोरातच जाणवत आहे ,यामुळे उकाडय़ाने येथील जनता हैराण झालीआहे, खेड्यापाड्यातील जनता पाटण शहरात बाजारहाट, कामानिमित्ताने, येत असते तसेच शाळा, कॉलेज साठी विद्यार्थी, पाटण शहरात येत असतात, त्यांची कडक उनामुळे अंगाची लाही लाही होत आहे . पण त्यांना पाटण शहरात थंड पाणी मिळणे दुरापास्तच असते म्हणून.
हिच उणीव लक्षात घेऊन पाटण शहरातील व्यावसायिक तरूण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाटण तालुकाध्यक्ष मा. विकास हादवे व त्यांच्या पत्नी सौ. किरण हादवे या उभयतांनी स्वखर्चाने पाटण शहरातील चाफोलीरोड कॉर्नर, नवीन बसस्थानक परिसरात तसेच तहसील कार्यालय परिसरात पाणपोई सुरू करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
सामाजिक कार्यात नेहमीच हिरिरीने सहभाग होणारे हादवे परिवार सर्वांना परिचित आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून विकास हादवे यांनी पाटण शहरातील अनेक समस्या जनतेसमोर आणल्या आहेत,स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ते तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी लढा उभारून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत.
पाटण नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत हादवे पती पत्नी नी मतदार जन- जागृती साठी विशेष मोहीम राबविली होती.
पाटण शहरातील रामापूर येथे या पतीपत्नीने सुरू केलेल्या वाणी संसार शाॅपी या छोट्याशा दुकान व्यवसायाच्या माध्यमातून आपणही समाजासाठी काही केले पाहिजे या उदात्त हेतूने या उभयतांनी पाणपोईंची सोय केली आहे. दररोज सकाळी स्वता या पाणपोईंची स्वच्छता करून त्यामध्ये पाणी ओतण्याची त्यांची दररोजची दिनचर्या चालू असते.
यामुळे शहरातील नागरिकांना ऐन उन्हाच्या तडाख्यातही पाणपोईचे माठातील थंडगार पाणी मिळत आहे.
या समाजोपयोगी अभिनव उपक्रमाचे कौतुक होत असून जनता हादवे पती पत्नीस धन्यवाद देत आहे.
शेवटी “पाण्यासारखा धर्म नाही” असेच यानिमित्ताने म्हणावे लागेल हे नक्की.