इंदूर: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतानं 1 डाव 130 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत बांगलादेशचा दुसरा डाव 213 धावांवर संपुष्टात आणला. या विजयासह भारतानं कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
इंदूर येथील होळकर मैदानात भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना रंगला. प्रथम फलंदाजी करणार्या पाहुण्या बांगलादेश संघानं भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या तोफखान्यासमोर पहिल्याच दिवशी शस्त्रे खाली ठेवली. अवघ्या 150 धावांतच बांगलादेशचा संघ गारद झाला. मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव या वेगवान गोलंदाजांच्या तिकडीने मिळून बांगलादेशचे सात फलंदाज टिपले. त्यांना साथ मिळाली ती आर. अश्विनची. त्याने 2 बळी मिळविले. पहिल्या डावात मुशफिकुर रहीमनं सर्वाधिक 43 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघानं पहिला डाव 6 बाद 493 धावांवर घोषित केला. सलामीवीर मयांक अग्रवालनं 243 धावांची खेळी केली. रोहित शर्मा अवघ्या सहा धावा करून बाद झाला. चेतेश्वर पुजारानं 54 धावा करून चांगली साथ दिली. कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला. अजिंक्य रहाणेनं 86 धावा केल्या. तर अष्टपैलू रवींद्र जडेजानं 60 धावांची तुफानी खेळी केली. उमेश यादवनंही 25 धावा केल्या. बांगलादेशकडून अबु झायेदनं 4 विकेट घेतल्या.
भारतानं 493 धावांवर डाव घोषित केल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशच्या दुसर्या डावाची सुरुवातही अडखळत झाली. 72 धावांवरच बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत परतला होता. इम्रउल कायेस, शदमन इस्लाम, मोमिनुल हक, मोहम्मद मिथुन, महमुदुल्लाह हे बाद झाले होते. मुशफिकुर रहीमनं दुसर्या डावातही 64 धावा करून कसोटी वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला आर. अश्विननं बाद केलं. भारताच्या भेदक मार्यासमोर बांगलादेशची अंतिम फळी मैदानावर फार काळ तग धरू शकली नाही. त्यांचा डाव 213 धावांवर आटोपला. भारतानं 1 डाव आणि 130 धावांनी बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर अश्विननं दोन आणि उमेश यादवनं दोन विकेट घेतल्या. या विजयासह भारतानं बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
दुसरा डाव शमीचा ! पटकावला दोन वर्षांत सर्वोत्तम गोलंदाज बनण्याचा बहुमान
भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये मोहम्मद शमी गेल्या काही सामन्यांमध्ये भेदक मारा करतो आहे. विशेषकरुन दुसर्या डावात शमीचा मारा अधिक प्रभावशाली ठरतोय. कसोटी क्रिकेटमध्ये दुसर्या डावात गेल्या दोन वर्षांत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मान मोहम्मद शमीने पटकावला आहे.
29 वर्षीय मोहम्मद शमीने गेल्या दोन वर्षांत 20 डावांमध्ये 50 बळी घेतले आहेत. 32.2 चा स्ट्राईक रेट आणि 17.2 च्या सरासरीने शमी कसोटी क्रिकेटमध्ये दुसर्या डावात सर्वोत्तम कामगिरी करतो आहे. गेल्या दोन वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये दुसर्या डावात 25 किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणार्या गोलंदाजांच्या यादीत शमीची कामगिरी अव्वल ठरली आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आणि नॅथन लॉयन यांची कामगिरी सध्याच्या घडीला शमीच्या जवळपास जाणारी आहे. कमिन्सने आतापर्यंत 48 तर लॉयनने 47 बळी घेतले आहेत.
शमी, कमिन्स आणि लॉयन या गोलंदाजांव्यतिरीक्त या यादीमध्ये कगिसो रबाडा (34 बळी), रविंद्र जाडेजा (32 बळी), जसप्रीत बुमराह (29 बळी), जोश हेजलवुड (29 बळी) हे गोलंदाज आहेत. कसोटीत दुसर्या डावात फिरकीपटू गोलंदाज अधिक बळी घेतात, मात्र शमीने गेल्या काही वर्षांत आपल्या गोलंदाजीमध्ये केलेली सुधारणा ही नक्कीच वाखणण्याजोगी आहे. बांगलादेशआधी भारताने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका 3-0 ने जिंकली होती, या मालिकेतही भारताच्या विजयात शमीचा मोठा वाटा होता.
कर्णधार विराटचा धोनीला धोबीपछाड
बांगलादेशवर डावाने मिळवलेल्या विजयासोबतच कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराटचा हा 10 वा डावाने विजय ठरला आहे. धोनीने कर्णधार म्हणून 9 सामन्यांमध्ये डावाने विजय मिळवून दिला आहे.
6 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी
भारतीय संघाचा हा सलग सहावा कसोटी विजय ठरला. याचसोबत भारताने सलग वेळा विंडीजमध्ये झालेले 2 सामने भारताने जिंकले. त्या पाठोपाठ दक्षिण अफ्रिकेविरूद्ध भारताने 3 सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. त्यासोबत भारतीय संघाने आज बांगलादेशला पहिल्या कसोटीत पराभूत करत विजेतेपदाचा षटकार लगावला आणि स्वत:च्याच विक्रमाशी बरोबरी केली. या आधी 2013 मध्ये भारताने सर्वाधिक सलग सहा कसोटी सामने जिंकले होते.
भारतीय संघाचं गुणांचं त्रिशतक
2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात भेदक मारा करत बांगलादेशच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं. या विजयासह भारताने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत गुणांचं त्रिशतक झळकावलं आहे. याचसोबत भारताने या स्पर्धेत आपलं अव्वल स्थानही कायम राखलं आहे.
बांगलादेशचा खुर्दा; भारताचा 1 डाव 130 धावांनी दणदणीत विजय
RELATED ARTICLES