सातारा-: सातारा आणि जावली तालुक्यात दरवर्षी पावसाळी पर्यटन बहरत असते. भांबावली, वजराई, ठोसेघर आदी धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते मात्र, हुल्लडबाजी, गोंधळ आणि सातत्याने दुर्घटना घडत असल्याने अशा पर्यटनस्थळी पर्यटनास बंदी करण्यात आली आहे. त्याचा विपरीत परिणाम म्हणजे स्थानिकांचा व्यवसाय, रोजगार धोक्यात आला आहे. स्थानिकांची रोजीरोटी सुरु राहावी यासाठी पर्यटनही सुरु राहणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करा, अशा सूचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक घेण्यात आली असून पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासांदर्भात झालेल्या बैठकीस तहसीलदार नागेश गायकवाड यांच्यासह महसूल, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आदी सर्वच विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सातारा आणि जावली तालुक्यातील विविध पर्यटनस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, याची पाहणी करण्यात येणार आहे. आवश्यक ठिकाणी बॅरिकेट्स, सुरक्षा कठडे बांधणे तसेच सर्व पर्यटनस्थळी सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
पर्यटनस्थळी हुल्लडबाजी, गोंधळ होऊ नये आणि कोणतीही दुर्घटना, अनुचित प्रकार घडू नये, पर्यटकांना सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घेता यावा, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद केल्यास स्थानिकांचा व्यवसाय, रोजगार ठप्प होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यामुळे पर्यटकांसाठी सुरक्षित पर्यटन व्यवस्था करून पर्यटन विना दुर्घटना सुरु राहिले पाहिजे, याची खबरदारी घेण्याच्या सक्त सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी प्रांताधिकारी भोसले यांनी केल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पर्यटन हे आनंद घेण्यासाठी आहे, आपला जीव घालवण्यासाठी नाही, याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. हुल्लडबाजी, गोंधळ किंवा कोणताही अनुचित प्रकार न करता पर्यटकांनी निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला पाहिजे. त्यामुळे पर्यटकांनीही हुल्लडबाजी, गोंधळ न करता, आपल्या सुरक्षिततेचे, आपले जीवन अनमोल आहे याचे भान ठेवावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केले आहे.